होमपेज › Satara › सातार्‍यातील नगरसेवक बाळू खंदारेला अटक

सातार्‍यातील नगरसेवक बाळू खंदारेला अटक

Published On: Jan 31 2018 9:26PM | Last Updated: Jan 31 2018 9:25PMसातारा : प्रतिनिधी

नगरसेवक विनोद उर्फ बाळू खंदारे याला सातारा शहर पोलिसांनी बुधवारी रात्री सातार्‍यातून ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली असून रात्री उशीरा त्याच्या अटकेच्या कारवाईची प्रक्रिया सुरु होती. बाळू खंदारे सध्या सुरुचि राडा प्रकरणातील दोन व सावकारीच्या एका गुन्ह्यात संशयित आरोपी आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, चार महिन्यांपूर्वी आनेवाडी टोल नाक्यावरुन सातारा येथील सुरुचि बंगल्याजवळ खासदार व आमदार गटात जोरदार राडा झाला होता. यातील दोन तक्रारींमध्ये बाळू खंदारे याचा संशयित आरोपी म्हणून सहभाग आहे.

पोलिस सर्व संशयितांसह बाळू खंदारेचाही शोध घेत होते मात्र तो सापडत नव्हता. सुरुचि राडा प्रकरणातील अनेक संशयितांनी जिल्हा न्यायालय व उच्च न्यायालयात तात्पुरत्या अटकपूर्व जामीनासाठी अर्जही केले. बाळू खंदारे याने मात्र जामीनासाठी अर्ज केलेला नव्हता. बाळू खंदारे सुरुचि प्रकरणात पसार असतानाच त्याच्याविरुध्द सातारा शहर पोलिस ठाण्यात सावकारीचाही गुन्हा दाखल झाला.

बुधवारी बाळू खंदारे सातार्‍यात आला असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तत्काळ पथक तयार करुन रात्री ७ वाजण्याच्या सुमारास सापळा लावला असता तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला.  रात्री उशीरापर्यंत त्याच्या अटकेची कारवाई सुरु होती. सध्या त्याच्यावर एकूण तीन गुन्हे दाखल असल्याने कोणत्या गुन्ह्यात अटक होणार याबाबतची नेमकी माहिती मिळू शकली नाही.