Wed, Apr 24, 2019 21:59होमपेज › Satara › काँग्रेसची 26 रोजी संविधान बचाव रॅली

काँग्रेसची 26 रोजी संविधान बचाव रॅली

Published On: Jan 23 2018 10:52PM | Last Updated: Jan 23 2018 10:32PMसातारा : प्रतिनिधी

देश आणि राज्यातील सत्ताधारी संविधान बदलण्याच्या प्रयत्नात असून याविरोधात दि. 26 जानेवारी रोजी सातार्‍यात लोकतंत्र बचाव व संविधान बचाओ रॅली काढण्यात येणार असून यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष आ. आनंदराव पाटील यांनी केले.

सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीत आयोजित केलेल्या बैठकीत आ. पाटील बोलत होते. बैठकीस कार्याध्यक्ष अ‍ॅड. विजयराव कणसे, अजितराव पाटील चिखलीकर, बाबासाहेब कदम, साहेबराव जाधव, प्रल्हाद चव्हाण, शिवाजीराव फडतरे आदी  पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते.

आ. आनंदराव पाटील म्हणाले, या देशाची घटना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चांगला दृष्टीकोन ठेवून तयार केली. त्या माध्यमातून  देश एकसंघ बांधण्याचे काम केलेले आहे. सर्वधर्मसमभाव राखून निधर्म राष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. घटना वाचविण्यासाठी प्रदेश काँग्रेसच्या सुचनेनुसार  सातारा जिल्हा काँग्रेस पक्षातर्फे दि. 26 रोजी काँग्रेस कमिटी ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या दरम्यान, संविधान बचाव रॅली काढण्यात येणार आहे. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी व्हावे यासाठी दि. 25 रोजी प्रत्येक तालुक्यात पदाधिकार्‍यांनी बैठका घेवून नियोजन करावे. प्रत्येक पदाधिकार्‍यांनी आपली जबाबदारी ओळखून जास्तीत जास्त कार्यकर्ते रॅलीत सहभागी होण्यासाठी प्रयत्न करावेत.

विधान परिषद व विधानसभेमध्ये वाटेल तसे कायदे केले जात आहेत. भिमा कोरेगावमध्ये जी घटना घडली त्यामुळे देश कोणीकडे चालला आहे हे लक्षात येते. यामुळे  गावागावामध्ये  वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी काँग्रेस पक्ष सर्व जिल्ह्यामध्ये शिबीरे घेवून पक्षाची आगामी काळातील होणार्‍या निवडणुकासंदर्भात पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले जाणार असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले. यावेळी प्रतापराव देशमुख, प्रा. नायकवडे यांनी मनोगत व्यक्त केले.