Thu, Jul 18, 2019 00:10होमपेज › Satara › रंगीबेरंगी फुलांमुळे निसर्गाचा रंगोत्सव   

रंगीबेरंगी फुलांमुळे निसर्गाचा रंगोत्सव   

Published On: Feb 28 2018 1:12AM | Last Updated: Feb 27 2018 9:07PMसातारा : प्रवीण शिंगटे 

रंगपंचमीचा सण अवघ्या 4 ते 5 दिवसांवर येवून ठेपला आहे. मात्र, होलिकोत्सवाच्या अगोदरच निसर्गातील रंगोत्सवही डोळ्यांचे पारणे फेडत आहे. सातारा शहर व परिसरातील वेगवेगळ्या झाडांना बहर आला असून त्यांच्या रंगीबेरंगी फुलांमुळे निसर्गाची रंगपंचमी सुरू असल्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

आज आपण अनेक घटकांचे रंग बदलताना पाहत असतो. राजकारणात तर सतत रंग बदलतच असतात. निसर्गात सुध्दा असा सातत्याने रंगबदल होत असतो. श्रावणात पाचूच्या हिरव्याकंच रंगाने आसमंत बहरलेला असतो.त्यात भाद्रपदात तेरडा, सोनकी गौरीची फुले यांना या हिरव्या रंगात जरीची किनार लाभते. साधारणत: ऑक्टोबरपासून पुन्हा रंगबदल सुरू होतो. सध्या शिशिरात होणार्‍या पानगळीच्या आधी हिरव्या रंगापासून पिवळ्या रंगाकडे झुकणार्‍या असंख्य छटा सभोवताली पहावयास मिळत आहेत. सातारा शहर व परिसरातील डोंगररांगात फेरफटका मारला असता विविध झाडांना रंगीबेरंगी फुलांचा बहर आला असल्याचे चित्र ठिकठिकाणी पहावयास मिळत आहे.

कडक उन्हात पळसाच्या  झाडाखालचा तसेच निलमोहोरच्या झाडाखालचा फुलांचा सडा वेगळीच अनुभूती देत आहे. एकंदरीतच हा निसर्गातील रंगोत्सव  मनाचे भाव बदलून टाकतो.  लाल, पिवळी,  गर्द निळी, गुलाबी, पांढरी, पांढरी फुलं जणू रंगपंचमी खेळत असल्याचे अभास निर्माण करत आहेत. या रंगोत्सवात झाडावरील फुलांचा सकाळी उमलताना असलेला रंग संध्याकाळी सूर्य मावळेपर्यंत हळूहळू बदलताना दिसतो. त्यामुळे निसर्गाचा एक अद्भूत चमत्कारच पहावयास मिळत असतो. पालवीतही झाडांचे आकार आणि रंगछटा पहावयास मिळत असतात. सातारा शहर व परिसरातील डोंगर रांगामधील निसर्गाच्या या रंगोत्सवामुळे डोळ्याचे पारणे फिटताना दिसत आहे. अनेक निसर्गप्रेमींना  या रंगोत्सवाची छायाचित्रे  काढण्याचा मोह आवरताना दिसत नाही.