Fri, Apr 19, 2019 12:01होमपेज › Satara › स्वच्छता कर्मचारी भरतीत घोटाळा

स्वच्छता कर्मचारी भरतीत घोटाळा

Published On: Jan 12 2018 1:57AM | Last Updated: Jan 11 2018 10:45PM

बुकमार्क करा
सातारा : प्रतिनिधी

सेवाज्येष्ठता डावलून तब्बल 60 स्वच्छता कर्मचार्‍यांची भरती करण्यात आली. या भरती प्रक्रियेत घोटाळा झाल्याचे गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सत्ताधार्‍यांनीच उघडकीस आणल्याने सभागृहात खळबळ उडाली. या घोटाळ्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश  देण्यात आले. दरम्यान, प्रोसेडिंग कायम करण्यावरून सत्ताधारी तसेच विरोधक यांच्यात गदारोळ उडाला. मागील सभेत अशोक मोनेंना झालेल्या धक्‍काबुक्‍कीचे पडसादही सभेत उमटले. पहिल्यांदाच पोलिस बंदोबस्तात सभेचे कामकाज पार पडले.

सातारा नगरपालिकेची सर्वसाधारण सभा छत्रपती शिवाजी सभागृहात सकाळी 11 वाजता  नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी मागील सभेचे प्रोसेडिंग कायम करण्यावरून नगर विकास आघाडी तसेच भाजपच्या नगरसेवकांनी गदारोळ केला. अमोल मोहिते म्हणाले, लोकशाहीला साजेशी मागील सभा झाली नाही. बहुमताच्या जोरावर रेटून विषय मंजूर करण्यात आले. धक्‍काबुक्‍कीची घटना सभागृहाला काळिमा फासणारी असून त्या घटनेचा निषेध करतो. विरोधी नगरसेवकांना पोलिस संरक्षण मागण्याची दुर्दैवी वेळ आल्याचे मोहितेंनी सांगितले. नगरसेविका सिद्धी पवार यांनी पूर्वीच्या सभेच्या विषयपत्रिकेवर जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार करण्यात आल्याने प्रोसेडिंगचा विषय तहकूब ठेवावा, असे सांगितले. नगरसेवक अ‍ॅड. डी. जी. बनकर यांनी पूर्वीची सभा नियमांना धरून झाल्याचे सांगितले.  विरोधी पक्षनेते अशोक मोने म्हणाले, सभेत विषयांवर चर्चाच करायची नसेल तर सभा काढताच कशाला? 

सभेला आम्हाला बोलवता कशाला? याप्रकरणी प्रशासनाने चौकशीत कोणते मुद्दे मांडले ते सांगावेत, अशी मागणी केली. सर्वांना विचारात घेवून अजेंडा काढला जात नाही. दुजाभाव केला जात असल्याचा आरोप जांभळे यांनी केला. अ‍ॅड. बनकर म्हणाले, तुम्ही आम्हाला सांगू  नका. तुम्हाला विचारायचे कारण नाही. तुम्ही विरोध नोंदवा, असे सांगितल्यामुळे नविआ तसेच भाजप नगरसेवकांनी गदारोळ केला. वसंत लेवे म्हणाले, पूर्वी नगराध्यक्षांच्या सूचनेवरुन सदस्याला शिपायाकरवी हाताला धरुन सभागृहाबाहेर काढले जायचे. त्यापध्दतीची वागणूक दिली नाही, याचे आभार माना. लेवेंच्या या वक्‍तव्यानंतर सभागृहात गोंधळ झाला. राजू भोसले यांनी हेवेदावे विसरण्याचे आवाहन केले. याचवेळी मनोमीलनाच्या काळात घेतलेले निर्णय आघाड्यांची गोची करणारे ठरले. आरोग्य विभागाकडील सफाई कर्मचार्‍यांची रिक्‍त पदे, वारसा हक्‍काने नियुक्त्या देण्याबाबत  आस्थापना विभागाने  सभागृहासमोर विषय चर्चेसाठी ठेवला होता. त्यावेळी नगरसेवक वसंत लेवे म्हणाले, आरोग्य विभागात पूर्वी झालेल्या 60 स्वच्छता कर्मचार्‍यांची भरती बेकायदेशीरपणे करण्यात आली आहे. याप्रकरणी संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच पदाधिकार्‍यांवर कारवाई करुन त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश नगर विकास खात्याच्या डीएमए ऑफिसने दिले आहेत. संबंधित स्वच्छता कर्मचार्‍यांचा वारस कुठे गेला? त्यावर अहवाल काय पाठवला? ही चौकशी सुरु असतानाही पुन्हा स्वच्छता कर्मचारी भरतीची 16 जणांची यादी कशी काय आली? विरोधी पक्षनेते अशोक मोने म्हणाले,  नगरपालिकेत घडलेला हा प्रकार गंभीर आहे. या प्रकरणी समिती नेमून संबंधित सर्वांची चौकशी होवून कठोर कारवाई झाली पाहिजे. कर्मचारी यादीही तपासा, अशी मागणी मोने यांनी केली. यावर तोंडाला पाने पुसू नका, असे जांभळे यांनी ठणकावले.