होमपेज › Satara › संतप्त दिव्यांगाचा अधिकार्‍यांनाच घेराव

संतप्त दिव्यांगाचा अधिकार्‍यांनाच घेराव

Published On: Jan 11 2018 1:09AM | Last Updated: Jan 10 2018 10:40PM

बुकमार्क करा
सातारा : प्रतिनिधी

सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात बुधवारी दाखल्यांसाठी हेटाळणी झाल्यामुळे संतप्त झालेल्या दिव्यांग व्यक्‍तींनी अचानकच आंदोलनाचा पवित्रा घेतला. जिल्हा शल्य चिकीत्सकांसह इतर वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांना घेराव घालून त्यांनी जाब विचारला. अचानक उडालेल्या या गोंधळामुळे रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले. 

याबाबत अधिक माहिती अशी, दिव्यांग व्यक्‍ती नियमित दाखले घेण्यासाठी व नुतनीकरणासाठी सिव्हिलमध्ये आले होते. सकाळपासून त्यांनी सर्व ती प्रक्रियाही केली. मात्र तरीही रुग्णालय प्रशासनाकडून त्यांची हेटाळणी करण्यात आली. धक्‍कादायक बाब म्हणजे 15 ते 20 दिव्यांग व्यक्‍तींना गेल्या तीन महिन्यांपासून दाखला देण्यासाठी खेळवले जात होते. रुग्णालयात वारंवार जावूनही दाखला मिळत नव्हता. अखेर बुधवारी संबंधितांनी त्याचा जाब विचारला. दिव्यांगांचा रूद्रावतार पाहून काही कर्मचारी लपून बसले. या गोंधळाची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. श्रीकांत भोई यांना समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी संतप्‍त जमावाने  त्यांना घेराव घालून आपल्या भावना व्यक्‍त केल्या व तीन महिन्यांपासून दाखले देण्यासाठी टाळाटाळ होत असल्याचे सांगितले. त्यावर डॉ.भोई यांनी एकाचवेळी एका दिवसात 50 व्यक्‍तींनाच दाखला दिला जात असल्याचे सांगितले.

डॉक्टरांच्या या भूमिकेवर जोरदार आक्षेप घेवून केवळ ठराविक व लागेबंध असलेल्या व्यक्‍तींनाच दाखले देताना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप उपस्थित दिव्यांग व्यक्‍तींनी केला. तत्काळ दाखले न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. यामुळे वातावरण कमालीचे तंग झाले. सुमारे अर्धा तास रुग्णालयात गोंधळ सुरु होता.