Tue, Mar 19, 2019 03:11होमपेज › Satara › भुयारी मार्ग धोकादायक 

भुयारी मार्ग धोकादायक 

Published On: Dec 21 2017 1:51AM | Last Updated: Dec 21 2017 12:00AM

बुकमार्क करा

खेड : वार्ताहर

सातारा शहरालगतच्या राष्ट्रीय महामार्गावर खेड गावासाठी महामार्ग प्राधिकरणाने बांधलेला भुयारी मार्ग रस्ता अत्यंत अरुंद व धोकादायक ठरत आहे. हा मार्ग अपघाताला निमंत्रण देत असून येथील प्रवास जीवघेणा बनला आहे. याबाबत जिल्हाधिकार्‍यांना साकडे घालण्यात आले असून आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. 

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सहापदरी कामाच्या वेळी खेड गावाच्या प्रवेशद्वाराजवळ सदरबझार, कोयना सोसायटी येथून गावात व सातारा शहरात जाण्या-येण्यासाठी भुयारी मार्गाचा रस्ता बांधला आहे. त्याची उंची कमी व अरूंद असून येथून मोठ्या चार चाकी वाहनासह शहर बसला प्रवेश करणे शक्य होत नाही. या परिसरात खेड गावठाण सह विविध गृहनिर्माण सोसायटीतील सुमारे दहा हजार लोकसंख्या आहे. दिवसेंदिवस या परिसरात लोकवस्ती वाढत आहे. सध्या मोठ्या वाहनांना येण्या-जाण्यासाठी सुमारे तीन कि.मी. अंतरावरील वाढे चौक किंवा बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून शहराकडे महामार्ग ओलांडत जीव धोक्यात घालून यावे लागते. त्याचा विद्यार्थी, महिला व वयोवृद्ध ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तर रात्री-अपरात्री वैद्यकीय उपचारासाठी रूग्णांना शहरात नेताना गैरसोयींना समोरे जावे लागत आहे. वाढे चौकातील उड्डाणपूलाचे काम चालू असल्याने खेड गावाला जोडणार्‍या सेवारस्त्यावरून वाहतूक सुरू आहे. सेवारस्ता  ओलांडून भुयारी मार्ग पार करावा लागत असल्याने या ठिकाणी सातत्याने अपघातांची मालिका सुरू असून अनेक जण जायबंदी झाले आहेत. उंची व रूंदी वाढविण्यासाठी खेडच्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी ठराव करून महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांना निवेदनाद्वारे या पुर्वी कळविले असूनही संबंधित अधिकार्‍यांनी डोळेझाक केली आहे.  याबाबतचे निवेदन  पंचायत समितीचे सभापती मिलिंद कदम, सामाजिक कार्यकर्ते विकास कदम व ग्रामस्थांनी जिल्हाधिकार्‍यांना दिले आहे. तातडीने या भुयारी मार्गाची उंची व रूंदी न वाढवल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.