Sat, Jul 20, 2019 14:58होमपेज › Satara › सिगारेट ओढणाऱ्या ८ जणांची धरपकड

सिगारेट ओढणाऱ्या ८ जणांची धरपकड

Published On: Jun 21 2018 4:03PM | Last Updated: Jun 21 2018 4:03PMसातारा : प्रतिनिधी

गुरुवारी सकाळी सातारा पोलिसांनी शाळा, महाविद्यालय व सार्वजनिक ठिकाणी धुम्रपाण करणार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारुन थेट कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. सकाळपासून आठ जणांची धरपकड करुन पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याचे सत्र सुरु केले आहे. दरम्यान, यापुढे धूर काढणार्‍यांवर अशाच पध्दतीने कारवाई केली जाणार असून, सार्वजनिक ठिकाणी, शाळा, महाविद्यालय परिसरात धुम्रपान करु नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

खुलेआम धूम्रपानामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. विद्यार्थी, तरुणांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण वाढले असून, अनेकांना धूम्रपानामुळे कर्करोगाला बळी पडावे लागत आहे. सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान हा गुन्हा असून, यापुढे सिगारेट- तंबाखूजन्य पदार्थ विक्री प्रतिबंध कायदा (कोटपा) अंतर्गत कडक कारवाई, करण्याचे आदेश बुधवारी पोलिसांना दिले होते. त्यानुसार आजपासून प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.

गुरुवारी सकाळी राजवाडा स्टँड, एसटी स्टँड, पोवई नाका, बॉंबे रेस्टॉरंट तसेच शहरातील महाविद्यालय परिसरात पोलिसांच्या पथकाने कारवाईचा धडाका केला. अचानक पोलिसांनी धुम्रपान करणार्‍या युवकांना ताब्यात घेतल्यानंतर गोंधळ उडाला. सिगारेट ओढणार्‍यांना पोलिस पकडत असल्याची माहिती समोर आल्यानंतर अनेकांनी पळही काढला. दरम्यान, दिवसभरात सार्वजनिक ठिकाणी धूर काढणार्‍या आठजणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार, पोनि पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे. यापुढे ही कारवाई तीव्र केली जाणार आहे. शाळा परिसर, खुलेआम सिगारेट ओढणार्‍यांवर तसेच तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध विक्रीवर लगाम घालण्यासाठी तंबाखूमुक्त महाराष्ट्र अभियान राबवण्यात येत आहे. यासाठी सिगारेट- तंबाखूजन्य पदार्थ विक्री कायदा तथा कोटपाच्या अमंलबजावणीचे आदेश पोलिस दलाला आहेत.