Wed, Apr 24, 2019 20:23होमपेज › Satara › बसस्थानकासमोरील अतिक्रमणे हटवली

बसस्थानकासमोरील अतिक्रमणे हटवली

Published On: Jul 21 2018 10:35PM | Last Updated: Jul 21 2018 10:12PMसातारा : प्रतिनिधी

सातारा मध्यवर्ती बसस्थानका-समोरील हातगाडे तसेच टपर्‍यांवर सातारचे उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राजमाने व सहकार्‍यांनी कारवाई केली.  पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे फुटपाथ मोकळा झाल्याने पादचार्‍यांना चालणे सुकर झाले.

सातार्‍यातून गेलेला जुना राष्ट्रीय महामार्ग जिल्हा मार्ग म्हणून घोषित झाला. मात्र, त्यावरील अतिक्रमणे अद्यापही अडचणीची ठरत आहेत. यापूर्वी नेताजी सुभाषचंद्र बोस चौक ते पोवईनाक्यावरील सभापती निवासापर्यंत अतिक्रमणांवर कारवाई झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच सातारा नगरपालिका यांनी केलेल्या संयुक्‍त कारवाईवेळी पोलिसांनी मदत केली होती. त्यानंतर पुन्हा अतिक्रमणे याठिकाणी झाली. त्यावर पोलिसांनी कारवाईचा दंडुका उगारला. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असलेला हा मार्ग पुन्हा अतिक्रमणांनी व्यापला आहे. ग्रेड सेपरेटरचे काम सुरु असताना वाहतुकीची कोंडी होत आहे. मात्र, अतिक्रमणेही काढली जात नसल्याने वाहनचालक तसेच नागरिकांना या परिसरातून जाताना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.  मध्यवर्ती बसस्थानकासमोर टपर्‍या, हातगाडे तसेच किरकोळ विक्रेत्यांनी केलेल्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीची कोंडी होत होती. अपघाताचा धोकाही निर्माण झाला होता. या अतिक्रमणांवर लोकांच्या प्रचंड तक्रारी होत्या. सातारा तालुक्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राजमाने व सहकार्‍यांनी बसस्थानक परिसरात दुपारी अतिक्रमणांवर कारवाई केली. त्यांनी संबंधित विक्रेत्यांना काढण्याची सूचना केली. त्यानंतर विक्रेत्यांनी त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत 7 टपर्‍या, हातगाडे काढले. दरम्यान, राधिका रोडवरील वाहतुकीस अडथळा करणारी अतिक्रमणेही काढण्यात आली. पोलिसांकडून ही मोहीम अशीच सुरु ठेवली जाणार आहे. 

बसस्थानक परिसरात कारवाई केल्यानंतर रस्त्याने मोकळा श्‍वास घेतला तसेच पादचार्‍यांसाठी फुटपाथ मोकळा झाला. या कारवाईमुळे नागरिकांतून समाधान व्यक्‍त होत आहे.