Sun, May 19, 2019 13:57
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › दहावी बोर्ड परीक्षेची बुलेट ट्रेन थांबली...

दहावी बोर्ड परीक्षेची बुलेट ट्रेन थांबली...

Published On: Mar 23 2018 10:30PM | Last Updated: Mar 23 2018 9:11PMसातारा : मीना शिंदे   

21 फेब्रुवारीपासून सुरु झालेली बोर्ड परीक्षेची बुलेट ट्रेन एकदाची थांबली. हुश्श.. संपली एकदाची परीक्षा म्हणत दहावीच्या  विद्यार्थ्यांचेदेखील तब्बल 23 दिवस सुरु असलेले टेन्शन एकदाचे उतरले. महाराष्ट्र दहावी बोर्डचा शुक्रवारी  शेवटचा पेपर असल्याने गेली वर्षभर असलेले मुलांचे टेन्शन एकदाचे उतरले आणि रिलॅक्स झाल्यासारखे वाटले. त्यामुळे विविध शाळांमधून शेवटचा पेपर देऊन बाहेर पडताना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर आनंद जाणवत होता. शेवटच्या पेपरनंतर मुलांनी जंगी सेलिब्रेशन केले.

दहावी आणि बारावीची बोर्ड परीक्षा विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाच्या असतात. त्यांच्या शैक्षणिक वर्षातील टर्निंग पॉईंट असतात. त्यामुळेच दहावी- बारावीचे वर्ष म्हटले की फक्त आणि फक्त अभ्यास.  ना धड एन्जॉय, ना बाहेर फिरणे, अशा परिस्थितीत पालकांचे दडपण आणि अभ्यासाचे टेन्शन घेत वर्ष काढावे लागते. मुलांची बोर्ड परीक्षा म्हटले की पालकांचेही वर्षभर शेड्युल टाईट असते. मुलांना परीक्षा सुरु होण्याआधीच ती कधी संपते याकडे त्यांचे लक्ष लागलेले असते. आज अखेर महाराष्ट्र बोर्डच्या परीक्षा संपल्या. आता वेध लागतेल ते म्हणजे सुट्टीत कुठे कुठे फिरायला जायचे. गेली वर्षभर न केलेले ते सर्व या सुट्टीत अनुभवायचे असेच प्रत्येकाला वाटत होते.

पेपर देण्याची घंटा झाली आणि विद्यार्थ्यांनी सुटकेचा श्‍वास टाकला. पेपर कसा गेला या चर्चेपेक्षा आता आपण कुठल्या हॉटेलमध्ये जायचे आणि काय खायचे? याची चर्चा मुलांमध्ये रंगत होती. अनेक विद्यार्थ्यांना फेव्हरेट आईस्क्रीम खाण्यासाठी इतके दिवस मनाई होती. परंतू  शुक्रवारी ती कसर विद्यार्थ्यांनी भरुन काढली. पक्षाला नवीन पंख फुटल्याप्रमाणे आणि झाडाला नवीन पालवी फुटल्याप्रमाणे विद्यार्थ्यांचे थवेच्या थवे शाळेतून कलकलाट करतच बाहेर पडले. शेवटचा पेपर अवघड गेल्याची चर्चा विद्यार्थ्यांमध्ये होती. तरीही  सुट्टी लागल्याचा आनंद मुले उपभोगत होती तर परत कधी भेटणार 
याची हुरहुरही विद्यार्थ्यांच्या मनात होती. 

Tags : satara, bullet train, 10th board exams, stopped,