होमपेज › Satara › पुढारी ऑनलाईनचा दणका; हप्तेखोर पोलिस निलंबित

पुढारी ऑनलाईनचा दणका; हप्तेखोर पोलिस निलंबित

Published On: Jan 21 2018 9:44PM | Last Updated: Jan 21 2018 9:44PMसातारा : प्रतिनिधी

कारवाई न करण्यासाठी ट्रक चालकाकडे हप्ता मागणारा रहिमतपूर पोलिस ठाण्याचा हवालदार ए. व्ही. चव्हाण याची दै‘पुढारी’ने पोलखोल केल्यानंतर त्याची गंभीर दखल घेत जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी  हप्तेखोर पोलिसाला रविवारी निलंबित केले. या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली असून प्राथमिक चौकशीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, चव्हाण पैसे आणखी कोणासाठी घेत होता का? पोलिस व्हॅनमध्ये तो एकटाच बिनदिक्कतपणे कसा फिरत होता? असे सवाल उपस्थित केले जात आहेत.

रहिमतपूर पोलिस ठाण्याचे हवालदार चव्हाण हे पोलिस व्हॅनवर चालक म्हणून कार्यरत आहेत. रहिमतपूर येथील रोहन पवार यांचा मालट्रक आहे.  चव्हाण हे पवार यांना खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देवून हप्ता मागत होते. वारंवार हा प्रकार घडू लागल्याने अखेर रोहन पवार यांनी सातारा लाचलुचपत प्रतिबंध विभागातही धाव घेतली. याठिकाणी गेल्यानंतरही त्यांना मदत मिळू शकली नाही.

तक्रारदार रोहन पवार यांना पोलिस चव्हाण हे हप्त्याबाबत वारंवार मागणी करत होते. त्यानुसार शनिवारी हवालदार चव्हाणने पवार यांच्याकडून पैसेही स्वीकारले. याबाबतचे स्टींग ऑपरेशन ‘पुढारी’ने केल्यानंतर पोलिस दलातील खाबुगिरी चव्हाट्यावर आली. ‘पुढारी’ने समोर आणलेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये बिनधोकपणे पोलिस व्हॅनमध्ये येऊन पैसे घेत असल्याचे समोर आले.  त्यानंतर  पवार यांनी दै.‘पुढारी’ व जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे न्यायाची मागणी केली. पोलिस अण्णा चव्हाण हा आपल्याला खंडणी मागत असून त्याच्यावर तसा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही पवार यांनी पोलिस अधीक्षकांकडे अर्जाद्वारे केली.

शनिवारी या घडामोडी घडल्यानंतर रविवारी याबाबत दै. ‘पुढारी’ने पोलिस पैसे घेत असतानाचे सचित्र वृत्त प्रसिध्द केले. त्यामुळे पोलिस दलासह जिल्ह्यात खळबळ उडाली. पोलिस दलातील खाबुगिरीमुळे जिल्ह्यात संतापाची लाट निर्माण झाली. अखेर पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी या घटनेची गंभीर दखल घेत पैसे स्वीकारणार्‍या पोलिस चव्हाण याला निलंबित करुन खाबुगिरीला दणका दिला. तसेच या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीचे आदेशही दिले. 

निलंबनाच्या कारवाईमुळे पोलिस दलातही दिवसभर चर्चा रंगली होती. प्राथमिक चौकशीला सुरुवात झाल्याने घटनेच्या मुळाशी जाता येणार आहे. निलंबनाच्या कारवाईनंतर दै. ‘पुढारी’च्या रोखठोक भूमिकेचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

हप्त्याच्या साखळीत कोणा कोणाचा वाटा?

पोलिस चालक अण्णा चव्हाण हा 10 हजार रुपये मागत होता. अखेर तक्रारदार यांनी विनंती करुन सुरूवातीला दोन हजार रुपये घेण्याची विनंती केल्याचे या प्रकरणातील पवार यांचे म्हणणे आहे. त्यामुळे चव्हाण हा एकट्यासाठीच पैसे मागत होता की या साखळीमध्ये आणखी कोणाचा समावेश आहे? तसे असेल तर कोणाला कितीचा वाटा आहे? रहिमतपूर परिसरात आणखी कोणाकोणाकडून हप्तेगिरी सुरु आहे? असे सवाल उपस्थित झाले आहेत. यामुळे पोलिस अधीक्षकांनी याच्या मुळाशी जावे, अशी मागणी होत आहे.
 

बातमीःसातारा : पोलिसांची हप्तेगिरी कॅमेर्‍यात कैद(व्हिडिओ)