होमपेज › Satara › भाजपची उदयनराजेंना लोकसभेची ऑफर

भाजपची उदयनराजेंना लोकसभेची ऑफर

Published On: Sep 03 2018 1:42AM | Last Updated: Sep 02 2018 11:24PMसातारा: प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या भोवती वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी जाळे टाकायला सुरूवात केली आहे. पुरवठा मंत्री ना. गिरीष बापट यांनी दोनच दिवसांपूर्वी खा. उदयनराजेंवर स्तुतीसुमने उधळल्यानंतर दुसर्‍याच दिवशी सायंकाळी  भाजपच्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या प्रभारी  निता केळकर यांनी सातार्‍यात येऊन खा. उदयनराजेंना भाजपतर्फे लोकसभा निवडणूक लढण्यासाठी ऑफर दिल्याचे समजते. 

खा. उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेसचे असले तरी अलीकडच्या काळात मुख्यमंत्र्यांपासून भाजपच्या अनेक मंत्र्यांशी त्यांची जवळीक वाढली आहे. मुख्यमंत्र्यांनी तर सातार्‍यात येऊन खा. उदयनराजे हे मुक्‍त विद्यापीठ आहे, असे म्हटले होते. चार दिवसांपूर्वी शिवसेनेचे मंत्री ना. दिवाकर रावते यांनी खा. उदयनराजेंना बिनविरोध निवडून द्या, असे विधान करून खळबळ उडवून दिली होती. शिवसेनेला मराठा समाजाची मते हवी असल्याने ना. रावतेंनी हे विधान करून मराठा समाजाची सहानभूती मिळवल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यानंतर लगेचच पुरवठा मंत्री ना. गिरीष बापट सातार्‍यात आले. खा. उदयनराजे यांच्या शेजारी बसणे म्हणजे आमचे भाग्य असे म्हणून बापटांनी गुगली टाकली. तर बापट सातार्‍यातून लढणार असतील तर आपली माघार असेल असे म्हणत खा. उदयनराजेंनी षटकार खेचला होता. उदयनराजेंचे भाजपच्या नेत्यांशी वाढत चाललेले हे सख्य डोळ्यात भरणारे आहे. त्यानंतर लगेचच भाजपच्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या प्रभारी निता केळकर यांनी सातारा जिल्हा शासकीय विश्रामगृहावर उदयनराजेंची भेट घेतली. पक्षाच्यावतीने आपण लोकसभेची निवडणूक लढवावी, असा आग्रह त्यांनी उदयनराजेंकडे धरला. उदयनराजेंसमवेत यावेळी सुनील काटकरही होते. उदयनराजेंनी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नसल्याचे समजते. लोकसभा, विधानसभा निवडणूका एकत्र होण्याची शक्यता लक्षात घेऊन खा. उदयनराजे नेमका कोणता निर्णय घेतात. याविषयी उत्सुकता आहे.