Sun, Feb 24, 2019 09:20होमपेज › Satara › राज्यात मागच्या दाराने आणीबाणी :  अजित पवार

राज्यात मागच्या दाराने आणीबाणी :  अजित पवार   

Published On: Jan 05 2018 9:53PM | Last Updated: Jan 05 2018 9:53PM

बुकमार्क करा
 सातारा : प्रतिनिधी

राज्य होरपळून निघत आहे. गेली तीन वर्षे जनता अस्वस्थ आहे. मत व्यक्त करण्यालाही बंधने घातली जात आहेत. ही एक प्रकारची मागच्या दाराने लादलेली आणीबाणी आहे. हे सरकार अपयशी ठरले असल्याने ही आणीबाणी झुगारुन उलथवून टाकली पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री आ. अजित पवार यांनी सातार्‍यात पत्रकार परिषदेत मांडली. दरम्यान, भीमा कोरेगाव प्रकरणात सरकारने जे करायला हवे होते ते काहीही केले नाही. परिस्थिती आटोक्यात आणण्यात सरकार अपयशी ठरले आहे. हे सर्व प्रकरण घडवणार्‍या प्रवृत्तींचा शोध घेवून त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी आपली मागणी आहे, असेही आ. अजित पवार म्हणाले.

यावेळी आ. अजित पवार म्हणाले, भीमा कोरेगाव प्रकरण आत्ताच कसे घडले? हा पूर्व नियोजित कट आहे. सरकारला पोलिस यंत्रणेला याची माहिती असायला हवी होती. गृहमंत्रालयाचे व सरकारचे हे मोठे अपयश आहे. भीमा कोरेगाव घडवण्यामध्ये ज्या ज्या प्रवृत्ती आहेत त्यांचा शोध घ्या, त्यांना कडक शासन झाले पाहिजे. जनतेनेही शांतता व सलोखा ठेवावा. माथी भडकवणारे अनेकजण असतात. आपण सगळे भारतीय आहोत. माणुसकी हीच आपली जात आहे आणि तोच आपला धर्म आहे. हे महाराष्ट्रातील तमाम जनतेने लक्षात ठेवावे. 

आ. अजित पवार म्हणाले, वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी असहिष्णुतेच्या विरोधात विडा उचलला आहे. साहित्यिकांचा राजकारणाशी काहीही संबध नसतो. मात्र, एक नागरिक म्हणून देशाचा चांगला विचार त्यांच्या मनामध्ये असतो. देशात असहिष्णुता असल्यानेच या लोकांनी पुरस्कार परत केले. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी यांच्या हत्या झाल्या. हे खुन झाल्यानंतर इतके महिने झाल्यानंतरही यामागील मास्टर माईंड पकडला गेला नाही. ज्या व्यक्तिंनी जे कार्य केले त्यांच्या विरोधातील लोक या घटनांमागे आहेत का? हे सरकारने पहायला पाहिजे. असेही आ. अजित पवार म्हणाले.