Fri, Nov 16, 2018 19:34होमपेज › Satara › भिडे, एकबोटेंना अटक करा

भिडे, एकबोटेंना अटक करा

Published On: Jan 21 2018 2:55AM | Last Updated: Jan 20 2018 10:23PMसातारा : प्रतिनिधी

भीमा कोरेगाव दंगल घडवणार्‍यांना अटक झाली पाहिजे. हजारो आंबेडकरवादी तरुणांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, भिडे गुरुजी व मिलिंद एकबोटे यांना अटक करावी, या प्रमुख मागण्यांसाठी जिल्हा भारिप बहुजन महासंघ, सातारा जिल्हा ओबीसी विद्यार्थी संघ, राज्य ओबीसी संघटना, जिल्हा भारिप बहुजन महासंघ महिला आघाडी, महाराष्ट्र लोकशाही आघाडीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  उपोषण करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलनावेळी सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. जिल्हा भारिप बहुजन महासंघाच्यावतीने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, भिमा कोरेगाव व शेजारील वढू गाव पूर्णपणे बंद ठेवून त्याबाबत ठराव घेण्यात आले. घरांच्या मजल्यांवर दगडांचे साठे करुन पूर्वनियोजितरित्या जातीयवादी मनोवृत्तीने ही दंगल घडवून आणली. बंद गावातून युवकांचे जथ्थेच्या जथ्थे झेंडे व विविध शस्त्रे घेवून फिरत असताना सर्वसामान्यांवर तुफान हल्ला झाला. तरीही सरकारकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेतली गेली नाही. दंगलीचे मुख्य सूत्रधार मनोहर भिडे,  मिलिंद एकबोटे व संबंधितांवर  अटकेची कारवाई करावी. भिमा कोरेगाव दंगलीतील सहभागी दंगेखोरांवर गुन्हे दाखल  करावेत. त्यासाठी पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करावे. दि. 3 रोजी महाराष्ट्र बंद आंदोलनातील आंबेडकरवादी कार्यकर्त्यांवरील कोम्बिंग ऑपरेशन थांबवून त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावेत. दंगलीत झालेल्या नुकसानीची संबंधितांना भरपाई द्यावी. सरकारने मागण्यांचा विचार करुन तातडीने उचित कारवाई करावी. अन्यथा जनतेच्या रोषास सामोरे जावे लागेल.  जनता पुन्हा रस्त्यावर उतरेल, असा इशाराही  देण्यात आला आहे. यावेळी चंद्रकांत खंडाईत, अस्लम तडसरकर, सिध्दार्थ खरात, मिनाज सय्यद, सचिन कांबळे, भालचंद्र माळी, संगीताताई डावरे, कल्पना कांबळे, चित्रा गायकवाड सहभागी झाले होते.