Fri, Apr 26, 2019 17:25होमपेज › Satara › मैदान पालिकेचे; डल्ला खासगी व्यक्तीचा

मैदान पालिकेचे; डल्ला खासगी व्यक्तीचा

Published On: May 22 2018 10:40PM | Last Updated: May 22 2018 10:24PMसातारा : प्रतिनिधी

सातार्‍यातील गुरुवार पेठेतील शिर्के शाळा परिसरात काही वर्षांपूर्वी सातारा नगरपालिकेने विकसित केलेला  बास्केट बॉल व बॅडमिंटन हॉल एका खासगी अ‍ॅकॅडमीला देण्यात आला असून, पालिकेचे उत्पन्न बुडत आहे. मुलांना या खेळाच्या मैदानांपासून लांब ठेवले जात असतानाच नव्या बास्केटबॉल ग्राऊंडचा प्रस्ताव आहे. या कामाला  नागरिकांचा विरोध असून, आगामी सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेवरील विषय रद्द करावा, अशी मागणी गुरुवार पेठ, शनिवार पेठ, केसरकर पेठेतील नागरिकांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. 

गुरुवार पेठेतील शिर्के शाळा मैदान विकसित करण्यासाठी सातारा नगरपालिकेने कोट्यवधींचा निधी खर्च केला. ट्रायल फिट न घेताच त्या ठिकाणी शॉपिंग सेंटर बांधण्याचा घाट घातला गेल्याने पाच वर्षांपूर्वी लाखो रुपयांचा फटका पालिकेला सहन करावा लागला. त्यानंतरही शिर्के शाळा मैदानावर वारेमाप खर्च सुरू राहिला आहे. शॉपिंग सेंटर होत नाही म्हटल्यावर त्या ठिकाणी बास्केट बॉल आणि बॅडमिंटन हॉल बांधण्यात आले. मात्र, त्यामध्ये झालेल्या गैरप्रकारांची तक्रार लगतच्या तीन पेठांमधील नागरिकांनी केली आहे. जिल्हाधिकार्‍यांना गुरुवार पेठ, केसरकर पेठ तसेच शनिवार पेठेतील नागरिकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, गुरुवार पेठेतील सि.स.नं. 271 ही मिळकत     सन 2001-2002 मध्ये संबंधित पेठांतील नागरिकांच्या मागणीवरुन शिर्केशाळा मैदान मुलांना खेळण्यासाठी खरेदी केले. हे मैदान खासदार फंडातून विकसित करण्यात आले. त्याठिकाणी बास्केटबॉल तसेच बॅडमिंटन हॉल बांधण्यात आला. उर्वरित मोकळ्या जागेवर पेठेतील मुले खेळत होती. मात्र, बास्केटबॉल ग्राऊंडवर पैसे घेऊन एक व्यक्ती बास्केटबॉल अ‍ॅकॅडमी चालवत आहे. त्याठिकाणी दिवाबत्ती तसेच देखभाल दुरुस्ती नगरपालिका करते. मात्र, संबंधित व्यक्ती मुलांकडून मासिक शुल्क घेऊन बास्केटबॉलचे प्रशिक्षण देत आहे. पेठेतील मुलांना त्याठिकाणी फिरु दिले जात नाही. त्यामुळे या मुलांवर केवळ भिंतीवर बसून अ‍ॅकॅडमीतील मुलांचे खेळ पाहण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. मुले संबंधित मैदानावर गेल्यास हटकले जाते. मैदानावर खेळू दिले जात नाही. शिर्केशाळा मैदानावर उर्वरित राहिलेल्या थोड्या फार जागेत पेठेतील मुले कशीबशी खेळतात. मात्र, त्याठिकाणीही बास्केटबॉल ग्राऊंड तयार करण्याचे प्रस्तावित आहे. त्याबाबतचा ठराव दि. 28 रोजी होणार्‍या सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेवरी विषय क्र. 7 वर घेतला आहे. हा विषय कायमचा रद्द करावा आणि संबंधित पेठेतील मुलांवरील अन्याय दूर करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली असून या निवेदनावर 130 नागरिकांच्या सह्या आहेत.