Fri, May 29, 2020 19:08होमपेज › Satara › जिल्ह्यात ठिकठिकाणी बंदला संमिश्र प्रतिसाद

जिल्ह्यात ठिकठिकाणी बंदला संमिश्र प्रतिसाद

Published On: Sep 28 2019 1:27AM | Last Updated: Sep 27 2019 11:37PM
सातारा : प्रतिनिधी

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर त्याचे पडसाद राज्यभर उमटले. या पार्श्‍वभूमीवर सातारा जिल्ह्यातही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला असून कोठेही अनुचित घटना घडली नाही. 

याबाबत राष्ट्रवादीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले. दरम्यान, सातारा शहर, फलटण, महाबळेश्‍वर, मेढा येथील व्यवहार सुरळीत सुरू होते, तर खंडाळा, लोणंद, पुसेगाव, खटाव, पाटण  या गावांमधील बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती, तरी सातारा शहरात सर्व व्?यवहार सुरळीत सुरू होते. शुक्रवारी सकाळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पोवई नाका व परिसरात ‘वाघ आहे वाघ शरद पवार वाघ आहे’, ‘भाजप सरकार साहेबसे डरती है, ईडी को आगे करती है’ असा घोषणा देत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्‍त केला. बंदच्या पार्श्वभूमीवर कोणतीही अनुचित घटना घडू नये  यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. काही व्?यवसायिकांनी बंदमध्ये सहभागी होत आपले व्यवहार बंद ठेवले. मात्र, औषधांची दुकाने दवाखाने यासारख्या अत्यावश्यक सेवा सुरळीत सुरू आहे. 

लोणंदध्ये सकाळी 10 वाजेपर्यंतच बंदच

लोणंद बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. राष्?ट्रवादीने पुकारलेल्?या या बंदला काँग्रेसने पाठिंबा दिला. यावेळी सपोनि संतोष चौधरी यांना ईडीच्या कारवाईबद्दल राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी अ‍ॅड. सुभाष घाडगे व कय्युुम मुुल्‍ला यांचे हस्ते निषेधाचे निवेदन दिले.

सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंतच कोणताही बंद पाळण्?याचा निर्णय लोणंदचे नागरिक व व्?यवसायिकांनी घेतला आहे. त्यानुसार बंद पाळण्यात आला. या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. यावेळी योगेश क्षीरसागर, हणमंत शेळके, डॉ. नितीन सावंत, रविंद्र क्षीरसागर, दशरथ जाधव, सागर शेळके, गजेंद्र मुसळे, बबलू इनामदार, राजेंद्र खरात, जावेद पटेल, गौरव फाळके आदी उपस्थित होते.

खटाव, पुसेगावात कडकडीत बंद

खटाव व पुसेगावात कडकडीत  बंद पाळण्यात आला. अत्यावश्यक सेवा वगळता दोन्ही ठिकाणी सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते.

गुरुवारी रात्री दोन्ही ठिकाणी बाजारपेठेत फिरुन व्यावसायिकांना बंदबाबत सांगण्यात आले होते. शुक्रवारी सकाळपासूनच खटाव आणि पुसेगाव येथे कडकडीत बंद पाळला गेल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले होते. दरम्यान, पोलिसांनी खटाव आणि पुसेगावात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. 

वाईत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

शुक्रवारी वाई शहर व तालुक्यात उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला. वाई तालुका राष्ट्रवादीच्या वतीने वाई बंदचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत वाईतील व्यापार्‍यांनी उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद पाळला. अत्यावश्यक सुविधा वगळता मुख्य बाजारपेठेतील सर्व व्यवहार दिवसभर ठप्प होते. शुक्रवारी सकाळी 10 वाजता येथील किसनवीर चौकात राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.  सकाळपासूनच नेहमी गजबजलेली महात्मा फुले भाजी मंडई ओस पडली होती तसेच सराफ बाजारपेठ व बसस्थानक परिसरातील सर्व दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. दवाखाने, औषधांची दुकाने या अत्यावश्यक सुविधा वगळता शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस प्रतापराव पवार, तालुकाध्यक्ष विक्रांत डोंगरे, उपसभापती अनिल जगताप, शहराध्यक्ष प्रसाद  देशमुख, उपनगराध्यक्ष अनिल सावंत, नगरसेवक दीपक ओसवाल, प्रदीप चोरगे, भारत खामकर, चरण गायकवाड, राजेश गुरव, संग्राम पवार, बाळासाहेब बागुल, रमेश गायकवाड, भूषण गायकवाड आदींसह कार्यकर्ते  उपस्थित होते.

पाचवडमध्ये बाजारपेठ बंद

राष्ट्रवादी काँंग्रेसचे सुप्रीमो शरद पवार यांना ईडीने बजावलेल्या नोटीस व कारवाईच्या निषेधार्थ पाचवडमध्ये बाजारपेठ बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला. पंचक्रोशीतील शैक्षणिक संस्था, बँकेच्या व इतर कामकाज करण्यासाठी आलेल्या नागरिकांचे यामुळे हाल झाले.

पाचगणी -भिलारमध्येही बंद

राष्ट्रवादीचेे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने शिखर घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्या प्रकरणी भिलार व भोसे येथे दुपारी 1 वाजेपर्यंत व्यापार्‍यांनी आपली सर्व दुकाने बंद ठेवून निषेध व्यक्त केला तर पाचगणी येथे दुपारी 3 ते 5 या काळात दुकाने बंद ठेवण्यात आली होती.

खंडाळ्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ईडीने नोटीस बजावल्याच्या निषेधार्थ खंडाळा शहरात बंद पाळण्यात आला. शुक्रवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बाजारपेठेत फिरून दुकानदारांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. या आवाहनास प्रतिसाद देत काही वेळातच अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठ बंद झाली. यावेळी ड. शामराव गाढवे,बाजार समिती संचालक भरत गाढवे,धनसिंग खंडागळे, भाऊसाहेब गाढवे, दयानंद खंडागळे, अशोक गाढवे, आप्पासाहेब वळकुंदे, सागर गुरव, प्रविण सपकाळ, सुधाकर खंडागळे, जावेद पठाण, सुमित गायकवाड, बंडूनाना गाढवे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

महाबळेश्वरात राष्ट्रवादीचे प्रशासनाला निवेदन

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने सुडबुद्धीने गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ महाबळेश्वर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने निषेध करण्यात येवून नायब तहसीलदार श्रीकांत तिडके यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले. यावेळी जेष्ठ नेते बाळासाहेब भिलारे, उपनगराध्यक्ष अफझल सुतार, नगरसेवक संदीप साळुंके, प्रकाश पाटील, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, बाबुराव सपकाळ, शरद बावळेकर,माजी उपनगराध्यक्ष प्रभाकर कुंभारदरे आदी उपस्थित होते.

औंध व गोपूजमध्ये सर्व व्यवहार बंद

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्यावर शिखर बँक घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचलनालय (ईडी)मार्फत करण्यात आलेल्या कारवाई प्रकरणी औंधसह गोपूूूज व परिसरात सर्व आर्थिक व्यवहार, बाजारपेठ बंद ठेऊन नागरिकांनी या कारवाईचा निषेध केला. दरम्यान, नागरिकांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया मांडल्या. अत्यावश्यक सेवा, शाळा व महाविद्यालय वगळता या बंदमध्ये समाजातील सर्व घटक सहभागी झाले होते. बंदमुळे सर्वत्र शुकशुकाट जाणवत होता. बंदमुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली होती तसेच औंध पोलिसांनी ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

कोरेगावमध्ये बंदला प्रतिसाद

राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यावर  ईडीने गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ कोरेगावमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातील व्यावसायिक व नागरिकांनी बंदमध्ये सहभागी होत दुकाने, व्यवसाय  बंद ठेवले. दरम्यान, शहरातील अत्यावश्यक  सुविधा या बंदमधून वगळण्यात आल्या होत्या. 

दरम्यान भाजपच्या व्यावसायिक बांधवा़ंनी राष्ट्रवादीने पुकारलेल्या  बंदमध्ये सहभागी न होता व्यवसाय सुरु ठेवले होते.