Fri, May 24, 2019 08:45होमपेज › Satara › सातार्‍यातील अपूर्वा, माया मेडिकल्सचे परवाने रद्द

सातार्‍यातील अपूर्वा, माया मेडिकल्सचे परवाने रद्द

Published On: Apr 24 2018 10:30PM | Last Updated: Apr 24 2018 10:27PMसातारा : प्रतिनिधी

हिरापूर, ता. सातारा येथे सापडलेल्या बेकायदा गर्भपात औषधप्रकरणी  दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले. औषध प्रशासनाने केलेल्या चौकशीत सातार्‍यातील प्रोप्रा. पंकेशकुमार ओसवाल यांच्या माया सेल्स आणि प्रोप्रा. सुषमा देशमुख यांच्या अपूर्वा एजन्सीज मेडिकलमध्ये अनियमितता असल्याचे स्पष्ट झाल्याने परवाने रद्द करण्यात आले.  होवाळे हॉस्पिटलची चौकशी करण्यात आली असून, याप्रकरणातील दोषींवर खटले दाखल करण्याचा इशारा सहायक आयुक्त (अन्न) वि. द. सुलोचने यांनी पत्रकार परिषदेत दिला.

वि. द. सुलोचने म्हणाले, अजय संकपाळ (रा. हिरापूर, ता. सातारा) याच्या राहत्या घरातून औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी वॉच ठेवून गर्भपाताची एमटीपी किट जप्त केली. अजय संपकाळ याने दिलेल्या माहितीनुसार, औषधांचा साखळी पुरवठादार अमीर खान, प्रशांत शिंदे व विलास देशमुख यांच्याकडे चौकशी करून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी औषध निरीक्षक गेले. मात्र, त्यावेळी गुन्हा नोंदवून घेतला नाही. जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केल्यानंतर सातारा तालुका पोलिस स्टेशनला दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. प्रवीण देशमुख याला अटक केल्यानंतर हे प्रकरण सखोल चौकशीसाठी स्थानिक गुन्हे शाखेकडे हस्तांतरितकरण्यात आले. औषध प्रशासनाने जप्त केलेल्या एमटीपी किटची खातरजमा सायनोकेम फार्मास्युटिकल्स प्रा. लि. हरिद्वार या उत्पादक कंपनीच्या प्रतिनिधींकडून केली. मात्र, संबंधित औषधाचे उत्पादन कंपनीने केलेच नसल्याचे प्रतिनिधीने सांगितल्याने गर्भपाताची औषधे बनावट असल्याचे स्पष्ट झाले. स्थानिक गुन्हे शाखेने विलास देशमुख यास अंबरनाथ येथून अटक केली असून त्याच्याकडील माहितीनुसार या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे. 

अनियमितता आढळल्याने पंकेशकुमार ओसवाल यांच्या माया सेल्स राधिका रोड, सातारा तसेच सुषमा देशमुख यांच्या अपूर्वा एजन्सीज,  मंगळवार पेठ सातारा यांच्या मेडिकल्सचे परवाने नोटीस देवून रद्द केले. देशमुख यांच्या मेडिकलमधील औषधे संकपाळकडे सापडली त्याचे बिल नव्हते. आणखी एका मेडिकलला याप्रकरणी नोटीस देण्यात आली आहे. अजय संकपाळ, अमीर खान तसेच प्रशांत शिंदे यांना अद्याप अटक झालेली नाही. याप्रकरणी सखोल तपास करावा, अशी मागणी स्थानिक गुन्हे शाखेकडे केली आहे. दरम्यान, औषध प्रशासनाने सातार्‍यातील होवाळे हॉस्पिटलची चौकशी केली. संकपाळकडे सापडलेले किट याठिकाणीही मिळून आले. त्याचे बिल नसल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी औषध प्रशासन पाठपुरावा करत असून संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी कोर्टाकडे विनंती केली जाईल. या प्रकरणाचा पर्दाफाश करताना औषध निरीक्षक विजय नांगरे-पाटील यांची मदत झाल्याचे सांगत सुलोचने यांनी त्यांचे कौतुक केले.