Wed, Jul 17, 2019 08:00होमपेज › Satara › अंनिसने महिलेची केली जटेतून मुक्तता

अंनिसने महिलेची केली जटेतून मुक्तता

Published On: Aug 18 2018 1:02AM | Last Updated: Aug 17 2018 8:38PMसातारा : प्रतिनिधी

सातारा अंनिसने स्वातंत्र्यदिनी  50 वर्षीय सौ.मंगल चव्हाण (रा. आबेपुरी पाचपुतेवाडी, ता. वाई जि.सातारा) यांना समुपदेशनानंतर जटामुक्त केले. गेल्या 20 वर्षांपेक्षाही जास्त काळ डोक्यावर असलेल्या साधारण अडीच ते तीन फुटी जटा सोडवून सौ.मंगल यांना जटेच्या जोखडातून स्वतंत्र करण्याचे काम अनिसने केले आहे. 

21 व्या शतकातही आपला समाज अजूनही देवींच्या जटांसारख्या अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकल्याचे पहावयास मिळते. सौंदतीच्या यल्लमा देवीच्या असलेल्या या जटांमुळे अलिकडे डोकेदुखी, डोळेदुखी, मानदुखी व कंबरदुखी, झोप न येणे, डोक्यावर नीट झोपता न येणे अशा अनेक समस्यांना मंगल यांना सामोरे जावे लागत होते. या त्रासापासून मुक्त होण्यासाठी त्यांनी थेट अंनिसचे सातारा येथील मध्यवर्ती कार्यालय गाठले. या ठिकाणी त्यांना व्यवस्थित समुपदेशन करून जटा सोडवल्याने कोणताही अनिष्ट देवीचा कोप होत नसून ती केवळ अंधश्रद्धा असून अशा अनेक महिलांना जटांमधून मुक्त केल्याने खूप चांगले जीवन या महिला जगत आहेत असे सांगितले. यानंतर साधारण तीन तासाच्या प्रयत्नानंतर जटिल अशा जटा सोडवण्यास कार्यकर्त्यांना यश आले. जट सोडवल्यानंतर मंगल यांच्या चेह-यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. आता डोकं खूप हलकं वाटतंय. माझ्याप्रमाणे जर कोणी अशा जटा डोक्यावर ठेवून वावरत असेल तर त्यांना मी जट सोडवून घेण्याचे नक्कीच आवाहन करेन, असे सांगून सर्वांचे आभार मानले.

जटा निर्मूलनात कराडचे प्रा.डॉ.सुधीर कुंभार, सुहास पाटील, भगवान रणदिवे, डॉ.दिपक माने, सौ.वंदना माने, कु.शामली माने, हौसेराव धुमाळ, प्रकाश माने, जे.जी. जाधव वीर पोतदार, प्रशांत पोतदार सातारा यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.