Wed, Mar 27, 2019 02:27होमपेज › Satara › अमितचा अपघात की घातपात?

अमितचा अपघात की घातपात?

Published On: Aug 04 2018 10:28PM | Last Updated: Aug 04 2018 10:20PMसातारा : प्रतिनिधी

बुधवारी भल्यापहाटे सातारा-लोणंद रस्त्यावर अमित भोसले (रा. अरबवाडी ता. कोरेगाव) या युवकाचा मृतदेह सापडल्याच्या प्रकरणाला नाट्यमय वळण लागले असून, दोन दिवसांच्या तपासानंतर तो अपघात नसून, घातपात असल्याचे सातारा तालुका पोलिसांच्या तपासात समोर येत आहे. या घटनेने अरबवाडीत खळबळ उडाली असून, शनिवारी दिवसभर काही संशयितांकडे कसून चौकशी सुरू होती.
अमित सुभाष भोसले (वय 26) असे मृतदेह सापडलेल्या युवकाचे संपूर्ण नाव आहे. बुधवारी दि. 1 जुलै रोजी त्याचा शिवथर रस्त्यावर मृतदेह सापडला होता. प्रथमदर्शनी हा अपघात असल्याचे भासवून त्या ठिकाणी मृत युवकाची दुचाकीही आढळली होती. सातारा तालुका पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली. पोलिसांना सुरुवातीला मृतदेह ओळखण्यात अडचण आली. मात्र मृत व्यक्ती अमित भोसले असल्याचे समोर आल्यानंतर त्याच्या कुटुंबियांना माहिती देण्यात आली. दरम्यान, मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात नेल्यानंतर त्याचे शवविच्छेदन करुन कुटुंबियांकडे देण्यात आला.

अमितच्या कुटुंबिय व नातेवाईकांना या घटनेची माहिती समजल्यानंतर त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. यावेळी कुटुंबियांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. अमित हा पूर्णवेळ छत्रपती शिवाजी कॉलेजमधील स्पर्धा परिक्षा केंद्रात अभ्यास करत होता. अमितचा मृत्यू झाल्याचे समोर आल्यानंतर त्याठिकाणीही हळहळ व्यक्त होत होती.

दरम्यान, तालुका पोलिस ठाण्यात याबाबतची नोंद झाल्यानंतर पोनि प्रदीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार सुजीत भोसले हे या घटनेचा तपास करत होते. तपासामध्ये काही संशयास्पद बाबी समोर आल्याने त्यांनी तपासावर लक्ष केंद्रीत केले. गेली तीन दिवस या घटनेचा तपास सुरु असताना त्यांनी आतापर्यंत तिघांकडे चौकशी केली आहे. शनिवारी दिवसभर काही जणांकडे चौकशी सुरु होती. यामुळे अमित भोसले याचा अपघात झाला आहे की घातपात? याबाबतचे गूढ निर्माण झाले आहे.

पोलिस या प्रश्‍नांची उत्तरे शोधत आहेत...

अमित हा मूळचा अरबवाडीचा आहे. मंगळवारी तो दिवसभर शिवाजी कॉलेजमध्ये अभ्यास करत होता. तो अरबवाडीचा असताना शिवथरकडे कशासाठी गेला होता? हा पोलिसांना पहिला प्रश्‍न पडला. या प्रश्‍नाचे उत्तर शोधत असताना पोलिसांना काही सीसीटीव्ही फुटेज हाती लागले असून मंगळवारी अमित हा त्याच्या दुचाकीवरुन आणखी दोघांना घेवून जात असल्याचे समोर आले आहे. या दुचाकीवर आणखी एक महिलाही होती. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हे तिघेजण दुचाकीवर दिसल्यानंतर मात्र पुढे थेट अमित याचा दुसर्‍या दिवशी पहाटे मृतदेह सापडलेला आहे. यामुळे ते दोघेजण कोण? अमितचा शेवटचा व त्या दिवसभरात कोणाकोणाला कॉल केले? अमितचा कोणाशी वाद होता का? अशा विविध प्रश्‍नांची पोलिस उकल करत आहेत.