होमपेज › Satara › रुग्णवाहिका दरपत्रकाला कोलदांडा

रुग्णवाहिका दरपत्रकाला कोलदांडा

Published On: Dec 06 2017 1:41AM | Last Updated: Dec 05 2017 9:57PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी 

रुग्णवाहिका म्हणजे अंगावर काटाच येतो. या वाटेला जायलाच नको, अशी सर्वसामान्यांची भावना असली तरी अनेकदा रूग्णवाहिकेची गरज पडतेच. मात्र, या रूग्णवाहिका चालकांकडून आकारल्या जाणार्‍या दराबाबत मोठ्या तक्रारी आहेत. रूग्ण व नातेवाईकांची या चालकांकडून अडवणूक होत आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) जाहीर केलेल्या दरपत्रकाला अनेक चालकांकडून कोलदांडा दिला जात आहे. 

आयुष्यात प्रत्येक नागरिकाला  आजाराबाबत कुठले ना कुठले प्रसंग येत असतात. एखाद्या अत्यावश्यक वेळी तातडीची गरज म्हणून रूग्णवाहिकेची मदत लागते.  सातारा जिल्ह्यामध्ये अशा अनेक रूग्णवाहिका,  हॉस्पिटल व रूग्णालयासमोर  उभ्या असतात.अनेकवेळा हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध नसतात. त्यावेळी एम.आर.आय, सिटी स्कॅन व इतर काही चाचण्यांसाठी अन्य रूग्णालयात जाण्याचा प्रसंग येतो. तसेच काही वेळा सातार्‍यासह अन्य तालुक्याच्या ठिकाणी उपचाराच्या सोयी सुविधा नसल्याने संबंधित रूग्णालयाचे डॉक्टर्सही त्यांना पुणे किंवा मुंबई येथे उपचारासाठी नेण्याची सूचना करत असतात. त्यामुळे रूग्णांना नेण्यासाठी सुसज्ज रूग्णवाहिकेची गरज असते.  अशा तातडीच्या वेळी अगदी कमी अंतरासाठी  हजारो रुपये भाड्याची आकारणी केली जात असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आहेत. त्यावेळी बहुतांश रूग्णवाहिका  चालकांकडून  मनमानीपणे भाड्याची वसुली केली जाते.  प्रसंग दुखद असल्याने  या गोष्टीची वाच्यता न करता  अनेकजण मनमानी भाडे आकारणीला बळी पडत असतात. मात्र त्यातून काही रुग्णवाहिका चालकांचे चांगलेच फावले आहे. बर्‍याच रूग्णवाहिका सुस्थितीत नाहीत. त्यामुळे अनेकदा या रूग्णवाहिकांना अपघातासारख्या प्रसंगाना सामोरे जावे लागत आहे. त्यासाठी रूग्णवाहिकाही सुस्थितीत असणे गरजेचे आहे.

सातारा शहरासह जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी रुग्णवाहिकांकडून मनमानीपणे भाड्याची आकारणी केली जात आहे. त्यासाठी भाडेपत्रकांचा कोणताही आधार घेतला जात नाही. चालकांच्या तोंडातून जेवढा आकडा येईल तेवढे भाडे आकारण्यात येते. 

रूग्णांच्या नातेवाईकांनाही काहीही न बोलता सांगितलेले भाडे द्यावे लागत आहे. बर्‍याच वेळा रुग्णवाहिकेच्या चालकांची आणि रुग्णाच्या नातेवाईकांची रुग्णवाहिकेच्या भाड्यावरून वादावादीचे प्रसंग घडताना   दिसत असतात. रूग्णवाहिका चालकांनाही ही बाब नित्याचीच झाली आहे. मनमानी भाडे आकारणी होत असून  त्यांच्यावर कोणाचाही लगाम राहिलेला नाही. 

परिवहन प्राधिकरणाने रूग्णवाहिकेच्या दराबाबत अधिकृत दरपत्रक जाहीर केले आहे. मात्र हे दरपत्रक कागदावरच राहिले की काय? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे. रूग्णवाहिकेच्या भाड्याबाबत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत  रूग्णवाहिकांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. उपप्रादेशिक कार्यालयाने रूग्णवाहिकांच्या मनमानीपणाला आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.