Tue, Jun 25, 2019 13:33होमपेज › Satara › ‘कधी न येवो, असा क्षण वैर्‍यावर’

‘कधी न येवो, असा क्षण वैर्‍यावर’

Published On: Jan 14 2018 10:13AM | Last Updated: Jan 14 2018 10:13AM

बुकमार्क करा
उंडाळे ः वैभव पाटील
कुणाचे पालक रिक्षा चालक तर कुणाचे भाजी विक्रेते...जमिनही 10 ते 30 गुठ्यांच्या दरम्यान. पण अशी प्रतिकूल परिस्थिती असूनही आपला मुलगा नामवंत मल्ल व्हावा, ही दुर्दम्य इच्छाशक्ती. मात्र, याच इच्छाशक्तीला नियतीने हादरा देत शुक्रवारी मध्यरात्री पालकांच्या स्वप्नांचा अक्षरश: चक्काचूर केला. शुक्रवारची रात्र कुस्ती क्षेत्रासाठी ‘काळरात्र’च ठरली असून ‘कधी न येवो, असा क्षण वैर्‍यावर’ अशी हळहळ व्यक्त होत आहे. या अपघातात 6 पैलवान ठार झाले. 

वांगीजवळील अपघातात सौरभ अनिल माने (मालखेड) आणि आकाश दादासोा देसाई (काले) हे दोघे जागीच ठार झाले. तर अनिल पाटील (काले), सुदर्शन जाधव (येणपे), रितेश चोपडे (साळशिंरबे) आणि अनिकेत अशोक जाधव (किवळ) हे चौघे जखमी झाले आहेत. अपघातातील मृत सौरभ माने याचे वडिलांना सुमारे अर्धा एकर जमीन आहे. मात्र, मुलाला नामवंत मल्ल करण्यासाठी ते अहोरात्र पडेल ते कष्ट करत होते. दिवसभर ते रिक्षा चालक म्हणून काम करत. तर आई भाजीपाला विक्रीचे काम करून स्वत:च्या पोटाला ‘चिमटा’ घेत आपल्या मुलाला काहीही कमी पडू नये, याची काळजी घेत होती. काले येथील आकाश देसाई याचीही परिस्थिती सौरभ मानेहून वेगळी नाही.   

आकाशच्या वडिलांचे बालपण घोगाव (ता. कराड) येथेच गेले होते. लहानपणीच माता-पित्याचे छत्र हरपल्याने आपल्या वाट्याला आलेले भोग मुलांच्या वाट्याला येऊ नयेत, अशीच त्याच्या वडिलांची इच्छा होती. त्यामुळेच अवघी 10 गुंठे जमीन असूनही आकाशला नामवंत मल्ल बनवायचे, असा ध्यास त्यांनी घेतला होता. कराडमधील शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या आणि कुंडलच्या कुस्ती केंद्रात प्रशिक्षण घेणार्‍या आकाशने काही दिवसापूर्वीच राष्ट्रीय पातळीवरील कुस्ती स्पर्धेत 84 किलो गटात तीन पदकेही मिळवली होती. जखमी अनिल पाटील, रितेश चोपडे आणि सुदर्शन जाधव यांच्या कुटुंबियांची आर्थिक स्थितीही जवळपास अशीच आहे.