Wed, May 27, 2020 07:24होमपेज › Satara › झेडपी कर्मचार्‍याच्या खात्यात तब्बल ३२ लाख जमा

झेडपी कर्मचार्‍याच्या खात्यात तब्बल ३२ लाख जमा

Published On: Apr 26 2018 2:04AM | Last Updated: Apr 25 2018 10:23PMसातारा : प्रवीण शिंगटे 

झेडपी कर्मचार्‍याच्या बँक खात्यावर एकाच दिवसात तब्बल 32 लाख रुपये जमा झाल्याची आश्‍चर्यकारक घटना सातार्‍यात घडली. ‘अंशदान’ योजनेचे हे दान पदरी पडलेल्या सामान्य प्रशासन विभागातील या कर्मचार्‍याचा आनंद फार काळ टिकला नाही. खात्यात जमा झालेली ही भली मोठी रक्कम अंशदान योजनेतील असल्याचे समोर आल्यानंतर कॅफोंची चांगलीच पळापळ झाली. ऑनलाईनमधील त्रुटीमुळे झालेल्या या सावळ्या गोंधळाने या योजनेच्या पहिल्याच घासाला खडा लागला.

जिल्ह्याचे  मिनीमंत्रालय समजल्या जाणार्‍या सातारा जिल्हा परिषदेमधील विविध कारनामे समोर येत चालले आहेत त्यामुळे  झेडपीमधील  विविध विभाग या ना त्या कारणाने रोज चर्चेत येवू लागले आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्य   लेखा व वित्त विभागात अजबच प्रकार  घडला. त्याचे झाले असे की, राज्य शासनाने नव्याने अंशदान योजना 1 एप्रिलपासून सुरू केली आहे.अंशदान पेन्शन योजनेची काही कर्मचार्‍यांची कपात केलेली तब्बल 32 लाख रुपयांची रक्कम  अर्थ  विभागाने सामान्य प्रशासन विभागातील  एका कर्मचार्‍याच्या खात्यावर जमा झाली.अंशदान योजनेचे हे दान खात्यात पडल्याने कर्मचार्‍याचा आनंद गगनाला भिडला.

ऑनलाईन ही रक्कम सचिन कोंडावळे या कर्मचार्‍याच्या  बँक खात्यात जमा झाली. मात्र  जमा झालेली ही भली मोठी रक्कम अंशदान योजनेतील असल्याचे समोर आले. त्यानंतर जिल्हा परिषदेचा गांधारीसारखा झोपलेला अर्थ विभाग खडबडून जागा झाला. रक्कम मोठी असल्याने अर्थ विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांना ऐन उन्हाळ्यात चांगलाच  घाम फुटला, त्यांची पळापळ सुरू झाली.

मुख्य लेखा व वित्त अधिकारी वि. तु. पाटील  व अन्य कर्मचार्‍यांनी कोषागार कार्यालयात धाव घेवून ही रक्कम पूर्ववत करण्याची कार्यवाही सुरू केली. बुधवारी तर दुपारपासून मोती चौकातील स्टेट बँकेत कॅफो व संबंधित  रक्‍कम जमा झालेल्या कर्मचार्‍याने ठिय्या मांडला होता.

अर्थ विभागातील असे अनेक कारनामे दररोज समोर येवू लागले आहेत. या कारनाम्यांना आळा बसणे गरजेचे आहे. या सर्व प्रकाराला कारणीभूत असलेल्या कर्मचार्‍यांना वेळीच पायबंद घालणे गरजेचे आहे. त्यामुळे नावाजलेल्या झेडपीला काही ना काही कारणाने मान खाली घालावी लागत आहे. गेल्या दोन दिवसांपासून झेडपीत सुरू असलेल्या या  सावळा गोंधळाची चर्चा चांगलीच रंगली आहे.

दरम्यान,  अर्थ विभागाच्या  सावळा गोंधळाच्या या  प्रकारामुळे झेडपीच्या विविध विभागातील कर्मचार्‍यांचे पगार लांबणीवर पडले आहेत. त्यामुळे कर्मचारी अर्थिक अडचणीत आले आहेत. सध्या लग्नसराई, यात्रा व जत्रा,  मुलांना उन्हाळी सुट्टी असल्याने पैसे कोठून आणावयाचे असा प्रश्‍न पडला आहे. त्यातच शनिवार, रविवार, सोमवार व मंगळवार अशी सलग चार दिवस शासकीय सुट्टी असल्याने पगार मे महिन्यात होणार की काय? असा प्रश्‍न या कर्मचार्‍यांना पडला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी लक्ष घालून कर्मचार्‍यांचे रखडलेले पगार वेळेत करावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.