Wed, Apr 24, 2019 11:30होमपेज › Satara › लिफ्ट बंद असल्याने आपोआप घडला योगा

लिफ्ट बंद असल्याने आपोआप घडला योगा

Published On: Jun 21 2018 10:56PM | Last Updated: Jun 21 2018 10:18PMसातारा : प्रतिनिधी

राज्यासह देशात सर्वत्र आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मात्र जिल्ह्याचे मिनीमंत्रालय समजल्या जाणार्‍या सातारा जिल्हा परिषदेमधील दोन्हीही लिफ्ट बंद असल्याने अधिकारी व कर्मचार्‍यांना 4 मजल्याच्या सुमारे 100 पायर्‍या चढून योगा करण्याची वेळ आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या 69 व्या संमेलनात बोलताना 27 सप्टेंबर 2014 रोजी जगभरातील देशांच्या प्रतिनिधींना योग दिवस म्हणून 21 जून रोजी सामुहिक योग करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार 11 डिसेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्रांच्या 193 व्या संमेलनात 177 देशांच्या मान्यतेने या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. त्यानंतर 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्यानुसार गुरूवारी योग दिन जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला.

जिल्ह्याचे मिनीमंत्रालय समजल्या जाणार्‍या सातारा जिल्हा परिषदेमधील  दोन्ही लिफ्ट बंद होत्या. जुनी लिफ्ट गेल्या काही दिवसापासून बंद आहे. मात्र नवीन लिफ्टही सकाळपासूनच बंद होती. नेमकी योग दिनादिवशीच लिफ्ट बंद पडल्याने अधिकारी व कर्मचार्‍यांवर  योगा करण्याची वेळ आली.

जिल्हा परिषदेमध्ये सर्व विभागाची मुख्य कार्यालये असल्याने येथे रोज कामानिमित्त येणार्‍या नागरिकांची सतत वर्दळ असते. ग्रामीण भागातील काही नागरिक मात्र पायर्‍यांचा वापर करून विविध विभागात जात असतात तर काही वयोवृध्द  व दिव्यांग व्यक्ती लिफ्टचा वापर करत असतात. मात्र सकाळपासूनच या दोन्ही लिफ्ट बंद असल्याने  विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी पायर्‍या चढताना चांगलेच दमले होते. 

लिफ्ट सुरू असेल या आशेने अनेक कर्मचारी व कामानिमित्त आलेले नागरिक लिफ्टजवळ जात होते मात्र लिफ्ट बंद असल्याने कर्मचारी व नागरिकांचा अपेक्षाभंग होत होता. एवढ्या पायर्‍या चढून वर जायचे कधी या कल्पनेनेच नागरिकांच्या  चेहर्‍यावर प्रश्‍नचिन्ह उमटत होते. काही नागरिकांनी तर पायर्‍या चढून जाण्यापेक्षा आजचे काम उद्यावर ढकलून निघून गेले.  चौथ्या मजल्यावरील अधिकारी व कर्मचार्‍यांनी तर काम संपेपर्यंत खाली  न येणे पसंत केले. 

योगदिनाच्या पार्श्‍वभूमीवरच लिफ्ट बंद पडली, या योगायोगावरच नागरिकांसह कर्मचारी व अधिकार्‍यांमध्ये दिवसभर चर्चा रंगली होती.दरम्यान, दुपारनंतर नवीन लिफ्ट सुरू झाल्याने अधिकारी व कर्मचार्‍यांनी सुटकेचा निश्‍वास सोडला.