Fri, May 29, 2020 04:22होमपेज › Satara › 'विधानसभेबरोबर लोकसभा घेण्यासाठी उदयनराजेंकडून मुजरा घालायचे काम'

'विधानसभेबरोबर लोकसभा घेण्यासाठी उदयनराजेंकडून मुजरा घालायचे काम'

Published On: Sep 22 2019 9:03PM | Last Updated: Sep 22 2019 9:03PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  जयंत पाटीलसातारा : प्रतिनिधी

लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. जाहीर होतील कदाचित दोन-चार दिवसांत. जाहीर झाल्या नाहीत म्हणून कुणाच्या तरी पोटात गोळा उठला आहे, धक्का बसला आहे, आता पाया पडायचे काम चालू आहे. काही करुन विधानसभेबरोबर लोकसभा घ्या असा मुजरा घालून त्याठिकाणी विनवण्या करुन सांगायचं काम सुरु आहे. हातात बॅट धरायला आली म्हणून कोणी धोनी होत नाही आणि सातार्‍यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाची साथ सोडणारा कोणी कधी खासदार होत नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  जयंत पाटील यांनी  भाजपवासी झालेले श्री. छ. उदयनराजे भोसले यांना लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत सातारा येथील कल्याण रिसॉर्ट येथे आयोजित केलेल्या भव्य सभेत आ. जयंत पाटील बोलत होते. आ. जयंत पाटील म्हणाले, या जिल्ह्यातल्या खेड्यापाड्यातल्या तरुण कार्यकर्त्यांपासून वृद्धांपर्यंत ज्यांना दैवत मानलं, ज्यांच्या विचारांच्या पाऊल खुणा ज्यांनी आयुष्यभर जपल्या त्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जिल्ह्यात आज शरद पवार यांचे झालेले स्वागत आमच्या सर्वांच्या डोळ्याचे पारणे फेडून गेले. महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांत भारतीय जनता पार्टीने जो काही व्यभीचार सुरु केला आहे त्याला अनेक माणसे बळी पडली. त्या सगळ्यांकडे बघून घेण्याची प्रवृत्ती आजच्या या गर्दी असलेल्या तरुणाईकडे दिसली. साम, दाम, दंड, भेद वापरुन माणसं आपल्या पक्षात घेण्याचा प्रकार महाराष्ट्रात यापूर्वी कधी घडला नाही.

गेल्या तीन महिन्यात कुणाचा कारखाना अडचणीत आहे, कुणाची काही तरी भानगड सापडली आहे, कोण सेबीत अडकला आहे, या राज्यातील सगळ्यांची उणी-दुणी काढून त्यांना सगळ्याप्रकारे नतमस्तक करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री वेळ खर्च करतात तेव्हा सामान्य माणसाला आश्चर्य वाटते. जर तुम्हाला लोकसभेत एवढा विजय मिळाला, विधानसभेत तुम्ही 220 पेक्षा जास्त जाणार म्हणता मग तुम्हाला दुसर्‍या पक्षातील लोकांची गरज का? असा सवालही  जयंत पाटील यांनी केला.

ते पुढे म्हणाले, दीपक पवार मी तुमचे स्वागत करतो. तुम्ही आमचेच, आमच्यातलेच पण आम्ही काही लोकांना जास्त महत्व दिले त्यामुळे तुम्ही कंटाळून बाहेर निघून गेलात. पण पृथ्वी गोल असते. प्रत्येकाची वेळ यायला लागते. दीपक पवार आज वेळ आली आहे. सातारा शहरामध्ये, सातारा विधानसभा मतदार संघामध्ये बदल घडवल्याशिवाय राहणार नाही. तीन-चार वेळा सांगितलं बदल घडवू नका तेव्हा तुम्ही आमचं ऐकलं पण यंदा मात्र बदल घडवायलाच पाहिजे, असेही जयंत पाटील म्हणाले.