होमपेज › Satara › नगरसेवकाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न

नगरसेवकाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न

Published On: Aug 04 2018 10:28PM | Last Updated: Aug 04 2018 10:16PMसातारा : प्रतिनिधी

सातारा नगरपालिकेअंतर्गत स्वच्छता ठेक्यातील घंटागाडीवरील चालक-मालक ज्ञानेश्‍वर शेलार यांनी शुक्रवारी रात्री विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून, त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दरम्यान, याप्रकरणी त्यांच्या कुटुंबीयांनी नगरसेवकावर आरोप केल्याने पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.

याबाबत प्राथमिक माहिती अशी, ज्ञानेश्‍वर शेलार यांची पालिकेकडे घंटागाडी ठेक्याने असून, ते स्वत: घंटागाडी चालवत आहेत. गेल्या काही दिवसांपासून एक नगरसेवक त्यांना कमालीचा त्रास देत असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. घंटागाडी चालवण्यासाठी संबंधित नगरसेवक कधीही त्यांना बोलावत होता. यावेळी शेलार यांनी दिलेले काम वेळेत करत असल्याचे सांगितले. यामुळे चिडलेल्या नगरसेवकाने शेलार यांचे काम बंद करण्यास सांगितले.

या सर्व प्रकारामुळे ज्ञानेश्‍वर शेलार गेल्या दोन दिवसांपासून तणावाखाली होते. कर्ज काढून घंटागाडी घेतल्याने त्याचे कर्ज व कुटुंबियांचे गुजराण करणे त्यांचे मुश्कील झाले होते. या सर्व त्रासाला कंटाळूनच ज्ञानेश्‍वर शेलार यांनी शुक्रवारी रात्री विषारी औषध प्राशन केले. विष प्राशन केल्याचे समोर आल्याने त्यांना तत्काळ सातार्‍यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, पुढील उपचारासाठी सिव्हील हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले.

नगरसेवकाच्या त्रासाला व जाचाला कंटाळूनच शेलार यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचा कुटुंबियांनी आरोप केला आहे. यामुळे शनिवारी दिवसभर पालिका, रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण होते. रात्री उशीरापर्यंत मात्र याबाबत कोणतीही तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांनी दिली आहे.