Fri, May 24, 2019 08:45होमपेज › Satara › ‘आमालाबी मराठी पिक्चर बघायचाय’

‘आमालाबी मराठी पिक्चर बघायचाय’

Published On: May 22 2018 10:40PM | Last Updated: May 22 2018 10:01PMसातारा : मीना शिंदे 

 टीव्ही, केबलचे अतिक्रमण आणि वाढती  गुंडगिरी व फुकटे प्रेक्षक अशा अनेक कारणांनी ग्रामीण भागातील थिएटर्सची संख्या दिवसेंदिवस रोडावली आहे.  हिंदी चित्रपट आणि त्यातील शोकॉज अ‍ॅक्िंटग यामुळे तरुणाई  हिंदी चित्रपटाचा फर्स्ट शो हाऊसफुल्ल होतोय. मात्र, मराठी चित्रपटांना म्हणावासा प्रेक्षक वर्ग न लाभल्याने थिएटर मालक मराठी चित्रपटाचे शो आयोजित करत नसल्याचेच वास्तव समोर येत आहे. असे असतानाही मराठी चित्रपटाचा खास वर्ग  असून त्या वर्गातील थिएटर्सप्रेमींकडून ‘आमालाबी मराठी पिक्चर बघायचाय’ असा सूर उमटत आहे.

सातारा जिल्ह्यातील  थिएटर्सची संख्या दिवसेंदिवस  कमी होत आहेे.   परिणामी प्रदर्शित होणार्‍या मराठी चित्रपटांची संख्याही मार्यदितच राहते. त्यामुळे या चित्रपटांच्या व्यवसायाचा विस्तार होण्यास मर्यादा आहेत. त्यामुळे मराठी चित्रपट हाऊसफुल्ल झाला तरी त्या प्रमाणात उत्पन्न मिळू शकत नाही. त्यामुळे प्रमोशनवर खर्च करण्याचीही निर्मात्यांची तयारी नसते. बहुतांश उत्पन्न मुंबई, पुणे या भागातूनच येत असल्याने निर्माते, वितरकांचे शहरी भागाकडेच जास्त लक्ष असते. ग्रामीण भागात टीव्ही, केबलचे अतिक्रमण वाढल्याने चित्रपटगृहांची संख्या रोडावत चालली आहे. त्यातही मराठी चित्रपटांचे प्रदर्शन कमी होते. स्वप्नील, अंकुश, भरत, मकरंदची अ‍ॅक्टिंग आमालाबी आवडतीय. सई, सोनाली, मुक्तावर इथलीबी तितकीच मरत्यात. मराठी पिक्चर मोठा होतोय, ऑस्करपर्यंत जातोय, पण ग्रामीण भागात तो  बघायलाच मिळत नाही.  थिएटरला आला तर क्रेझ संपल्यावर येतो. मग टीव्हीवरच पिक्चर येण्याची वाट बघावी लागते.

 मराठी भाषेची अस्मिता वाढू लागल्याने मराठी चित्रपटाचा प्रेक्षक वर्ग वाढू लागला आहे पण अजून शहरी भागातच  जास्त प्रमाणावर प्रदर्शित होत आहे.  मराठीतला 80 टक्के व्यवसाय या मोठ्या शहरांतून येतोय म्हणून निर्माते, वितरकही ग्रामीण भागात जायलाच नको म्हणतात. त्यामुळे मराठीच्या सुमारे 70 टक्के प्रेक्षकांना  इच्छा असूनही मराठी चित्रपट बघता येत नाही. तर दुसरीकडे निर्माते म्हणतात की, थिएटरची संख्या कमी, त्यातही भाड्याने थिएटर घेऊन तिथे पिक्चर लावायचा म्हटलं तरी भाडे वसूल होईल की नाही हीच भीती. या सगळ्या चक्रात अडकलेल्या मराठी चित्रपटाने अजून महाराष्ट्राचे मार्केटच टॅप केलेले नाही. हे मार्केट जर मराठीला मिळू शकले तर साऊथच्या फिल्म इंडस्ट्रीला तो आव्हान देऊ शकतो.

प्रेक्षकांना भावणारी कथा, कथेत चांगला आशय असलेला चित्रपट महाराष्ट्रातील कोणत्याही भागात चालतोच. लक्ष्मीची पावले मराठी चित्रपटाकडे येत आहेत, मराठीमध्ये चांगले चित्रपटही रिलीज होत आहेत. चांगली गर्दीही होत आहे.  मात्र, मल्टीप्लेक्समध्ये अजूनही मराठी चित्रपट लावायला टाळाटाळ केली जात असून त्यातच मराठी चित्रपट  प्रदर्शनाकडे थिएटरवर प्रदर्शनासाठी अनास्था असल्याचे समोर येत आहे. ग्रामीण भागांत थिएटर्सची संख्याच कमी आहे. राज्य सरकारने यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. तरच हे चित्र निश्‍चितच बदलेल.