होमपेज › Satara › पोलिस अधीक्षकांचा पालिकेवर लेटर बॉम्ब

पोलिस अधीक्षकांचा पालिकेवर लेटर बॉम्ब

Published On: Sep 12 2018 1:50AM | Last Updated: Sep 11 2018 11:34PMसातारा : प्रतिनिधी

गणपती बाप्पांचे आगमन व विसर्जन यावरून जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी गंभीर दखल घेऊन थेट सातारच्या नगराध्यक्षा सौ. माधवी कदम व मुख्याधिकारी शंकर गोरे यांना नोटीस काढून धारेवर धरले आहे. विसर्जन नियोजनावरून सामान्यांमध्ये असंतोषाचे वातावरण असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न ऐरणीवर येऊ शकतो. याबाबत अनुचित प्रकार घडल्यास आपणाला जबाबदार धरले जाईल, असेही या नोटिसीमध्ये म्हटले आहे. दरम्यान, थेट एसपींनी सातारा पालिकेला तंबी देऊन लेटर बॉम्ब टाकल्याने प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहेे.

उद्या गणपती बाप्पांचे आगमन होत आहे. सातार्‍यात घरोघरी, सार्वजनिक मंडळांमध्ये गणेश बाप्पांच्या आगमनाची जय्यत तयारी झालेली आहे. गणपती बाप्पांचे आगमन काही तासांवर आले असताना अद्याप सातारा नगरपालिकेने विसर्जनाबाबत कोणताही निर्णय न घेतल्याने याची पोलिस प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दि. 8 रोजी नगराध्यक्षा व पालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांना नोटीस काढली आहे.

या नोटिसीमध्ये म्हटले आहे की, गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर गणेश विसर्जन स्थळ     व मार्ग निश्‍चित झालेला नाही. यामुळे सर्वसामान्यांमध्ये संभ्रमाचे व असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. गणपती बाप्पांच्या आगमनानंतर दीड दिवस तसेच 3, 5, 7, 9, 10 दिवसाच्या गणपतीचे विसर्जन होणार आहे. याशिवाय अनंत चतुर्थी दिवशी सर्व सार्वजनिक गणेश मुर्तींचे विसर्जन होणार आहे. असे असतानाही अद्याप पालिकेने घरगुती व सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जनाबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही.

या सर्व प्रकारामुळे सामान्य नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहेेे. यामुळे पालिकेने तत्काळ योग्य तो निर्णय घ्यावा. अन्यथा, यामुळे जर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला तर पालिका प्रशासनाला जबाबदार धरले जाईल, असे पोलिस अधीक्षकांनी काढलेल्या नोटिसीमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे.