Sat, Aug 17, 2019 16:48होमपेज › Satara › संदीप पाटलांनी तडीपारीनंतर मोक्याचीही केली ‘सेंच्युरी’

संदीप पाटलांनी तडीपारीनंतर मोक्याचीही केली ‘सेंच्युरी’

Published On: Mar 16 2018 8:29PM | Last Updated: Mar 16 2018 8:45PMसातारा : विठ्ठल हेंद्रे

सातारा शहरासह जिल्ह्यात ज्या सराईत गुन्हेगारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी गेल्या दोन वर्षात 'मोक्क्या'चा धडाका लावत 13 टोळीतील तब्बल 102 गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून 'मोक्का'(महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम) कारवाईची सेंच्युरी पूर्ण केली. दरम्यान, सातारा जिल्ह्याचा कार्यभार हाती घेतल्यानंतर तडीपारीत 100 हून अधिक व मोक्कासारख्या प्रकरणातही 100 हून अधिक गुन्हेगारांवर कारवाई केल्याने पोलिस दलाच्या इतिहासात रेकॉर्डब्रेक कारवाई झाली आहे.

सातारा शहर व जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीचा पुरेपूर फायदा उठवत जिल्हा पोलीसप्रमुख संदीप पाटील यांनी ‘मोके’ पे चौका लगावणारी कामगिरी केली आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे सातार्‍यातील गुन्हेगारी विश्वाचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे.

सातारा जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी व नागरिकांच्या मनात सुरक्षिततेची भावना रहावी यासाठी एसपी संदीप पाटील हे पहिल्यापासूनच आग्रही राहिले आहेत. जिल्हा पोलिस दलाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सर्व पोलिस ठाण्याच्या प्रमुखांना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार, गुंड, बेकायदा सावकारी करणारे, जबरी चोरी करणारे, घरफोडी बहाद्दर, समाजात भिती व दहशत निर्माण करणारे यांच्याबाबत कायदेशीर कारवाई करण्याबाबत सूचना त्यांनी केल्या होत्या.

पोलिस ठाण्याच्या अधिकार्‍यांनी प्रत्येक गुंडा-पुंडाची कुंडली तयार केल्यानंतर सुरुवातीला त्यानुसार तडीपारीचा धडाका लावण्यात आला. तडीपारीबरोबरच ज्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत हळूहळू त्या त्या टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्याचाही सपाटा लावण्यात आला. दहशत माजवून बेकायदेशीर मार्गाने आर्थिक फायदा करणारे व खासगी सावकारी करणार्‍या 13 टोळ्यांवर जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियमान्वये (मोक्का) प्रस्ताव तयार करुन तो कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे पाठवला होता. सातार्‍यातून 13 टोळ्यांविरुध्द मोक्काचे प्रस्ताव पाठवल्यानंतर त्या सर्व प्रस्तावांना अखेर मंजुरी मिळाली आहे.

बेकायदा सावकारी हा सातारा शहर व फलटण येथील गुन्हेगारीचे मूळ असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. गोरगरीब व मध्यमवर्गीयांना 10 ते 20 टक्के व्याजाने पैसे दिल्यानंतर त्या वसुलीसाठी सावकारांकडून सुलतानी बळाचा वापर होत होता. व्याजाने पैसे दिल्याचे सांगून गोरगरीबांची जमीन, घरे, वाहने परस्पर ही टोळी आपल्या नावावर करुन घेत होती. यामुळे अनेक कुटुंबे सातारा सोडून गेली, कोणी आत्महत्या केली व अनेकजण कर्जबाजारी झाले. या माध्यमातून सावकारी टोळीचे म्होरके व त्यांच्या गँग्जकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती जमा झाली. 

गेल्या दोन वर्षात मात्र जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी जिल्ह्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर गुन्हेगारीचे मूळ ओळखून त्यानुसार थेट कारवाईचा धडाका लावला. दोन वर्षापूर्वी जे गुंड समाजात खुलेआम व बिनधोकपणे फिरत होते ते आज गजाआड आहेत. तडीपारीमध्ये 100 जणांवर कारवाई केल्यानंतर मोक्कासारख्या किचकट गुन्ह्यातही योग्य व ठोस कारवाई राबवून त्यातही 100 जणांवर नुकतीच कारवाई केल्याने सातार्‍यातील गुन्हेगारीला दणका बसला आहे. यामध्ये अनेक रथीमहारथींचा समावेश असून येत्या काही दिवसात आणखी काही जणांवर मोक्क्याची कारवाई होण्याची शक्यता आहे.

या टोळ्यांना ठोकलाय मोक्का..

सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी 2016 मध्ये जबरी चोरी करणार्‍या 6 जणांच्या एका टोळीला, 2017 मध्ये दरोडा, दहशत, व्याजाच्या वसुलीसाठी गुन्हेगारी करणार्‍या 9 टोळीतील 67 जणांना मोक्का ठोकला. यंदाच्या वर्षातही मोक्काचा धडाका कायम असून खून, जबरी चोरी, सावकारी यासाठी 3 टोळ्यातील 29 संशयित आरोपींना मोक्का लावण्यात आला आहे. महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी अधिनियमान्वये रॉबर्ट उर्फ रॉय एडवर्ड सिक्वेरा, प्रमोद उर्फ खंड्या बाळासाहेब धाराशिवकर, महेंद्र उर्फ महेश गजानन तपासे, अमित उर्फ सोन्या आनंदराव देशमुख, आकाश उर्फ बाळू तानाजी खुडे, शेखर भगवान गोरे, आशिष मोहन जाधव, अनिल महालिंग कस्तुरे, चंद्रकांत उर्फ चंदर लक्ष्मण लोेखंडे,  अमित उर्फ बिर्‍या रमेश कदम, रुकल्या दशरथ चव्हाण अशी टोळीप्रमुखांची नावे आहेत.