Thu, Jul 18, 2019 14:23होमपेज › Satara › प्रा.आ. केंद्रासह ग्रामीण रुग्णालये सलाईनवर

प्रा.आ. केंद्रासह ग्रामीण रुग्णालये सलाईनवर

Published On: Aug 18 2018 1:02AM | Last Updated: Aug 17 2018 8:43PMसातारा : प्रविण शिंगटे

सातारा जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा देणारी आरोग्य यंत्रणाच कोमात गेली असून  प्राथमिक आरोग्य केंद्र व जिल्हा, उपजिल्हा तसेच ग्रामीण रूग्णालयात गेल्या 8 महिन्यांपासून औषधांचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे सर्व शासकीय रूग्णालये सलाईनवर असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. बहुतांश आरोग्य केंद्रांसह रूग्णालयात साथीच्या आजारांवरील औषधासह ड्रेसिंगपट्टी करण्यासाठी साहित्यच उपलब्ध नसल्याने रुग्णांना खासगी दवाखान्यांचा आधार घ्यावा लागत आहे.
ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी नागरिक साथीच्या रोगाने आजारी आहेत. शासनाने ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा वेळेत उपलब्ध व्हावी यासाठी ग्रामीण रूग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांची स्थापना केली. सातारा जिल्ह्यात सामान्य रूग्णालय 1, उपजिल्हा रूग्णालये 2, ग्रामीण रुग्णालये 15, प्राथमिक आरोग्य केंद्रे 71, आरोग्य उपकेंद्रे 400, आयुर्वेदिक दवाखाने 17, बामणोली येथे तरंगते वैद्यकीय पथक असा आरोग्य विभागाचा जिल्ह्यात लवाजमा आहे. या आरोग्य केंद्र व ग्रामीण रूग्णालयातून आरोग्य सेवा चांगल्या मिळत असल्याने गावोगावी या रूग्णालयांना आजारी रूग्ण प्राधान्य देतात.  लोकसहभागातून ग्रामीण रूग्णालय व  प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यामुळे खाजगी हॉस्पिटल्समध्ये मिळणार्‍या आरोग्य सेवा ग्रामीण भागातील ग्रामीण रूग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मिळू लागल्या आहेत. त्यामुळे या दवाखान्यातून महिन्याला सुमारे 1 लाखाहून अधिक रूग्ण वैद्यकीय सेवा घेतात.

 सध्या पावसाचे दिवस असल्याने हवामानात दिवसेंदिवस बदल होत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. ग्रामीण भागातील अनेक गावातील नागरिक साथीच्या आजाराने त्रस्त आहेत. अनेकजण   सर्दी, ताप व खोकला  याने आजारी आहेत.अशावेळी सर्वसामान्य रूग्ण ग्रामीण रूग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी जात आहेत. मात्र प्राथमिक आरोग्य केंद्र व रूग्णालयात सध्या औषधांचा तुटवडा जाणवत असल्याने  रूग्णांना आल्या पावली परत फिरावे लागत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला आहे.शासकीय रूग्णालयात औषधे उपलब्ध नसल्याने रूग्णांची मोठी गैरसोय होत आहे. काही रूग्णांना खाजगी दवाखान्यांचा आधार घ्यावा लागत आहे.

 गेल्या 8 महिन्यांपासून प्राथमिक आरोग्य केंद्रासह ग्रामीण रूग्णालयात औषधांचा तुटवडा भासू लागला आहे. वरूनच औषधे कमी प्रमाणात येत असल्याने त्या प्रमाणातच औषधे ग्रामीण भागातील आरोग्य केंद्राना दिली जात आहेत.प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषधांच्या तुटवड्यासंदर्भात जिल्हा परिषद सदस्यांनी वारंवार सर्वसाधारण सभेत  आवाज उठवला. मात्र शासनाने यावर्षी हाफकीन या संस्थेमार्फत औषधे घेण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत. त्यानुसार या संस्थेकडे जिल्हा परिषदेने निधीही वर्ग केला आहे. मात्र, अद्यापही हाफकीनमार्फत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना अद्यापही औषध पुरवठा झालेला नाही. 

जिल्ह्यातील रूग्णालयात साध्या तापाचे व खोकल्याचे औषधही मिळत नसल्याने लोकांची हेळसांड होत आहे. तसेच एखाद्याला श्‍वानदंश झाला तर त्याला तात्काळ श्‍वानदंश लसच उपलब्ध नसल्याचेही समोर आले आहे.  त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा पुरता बोजवारा उडालेला आहे. हाफकीन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून होणारी औषध खरेदी व्यवस्था अधांतरी असल्यामुळे प्रत्यक्षात औषधपुरवठा कधी होणार? असा सवाल आरोग्य यंत्रणेतील अधिकार्‍यांकडूनच उपस्थित केला जात आहे.