Wed, Nov 14, 2018 01:39



होमपेज › Satara › दरोड्याच्या तयारीतील टोळीला अटक

दरोड्याच्या तयारीतील टोळीला अटक

Published On: Sep 12 2018 1:50AM | Last Updated: Sep 11 2018 11:40PM



सातारा : प्रतिनिधी

दरोडा टाकण्याच्या तयारीत असणार्‍या 5 युवकांच्या टोळीच्या मुसक्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने (एलसीबी) आवळल्या. संशयितांनी कास, कण्हेर धरणासह ठिकठिकाणी प्रेमीयुगुलांची लूटमार केली असून त्यासह दुचाकी चोरी असे 25 गुन्हे केले असल्याची धक्कादायक कबुली दिली आहे. दरम्यान, सर्व संशयित बुधावलेवाडी (ता. खटाव) येथील असून त्यांच्याकडून दोन तलवारीही जप्त करण्यात आल्या आहेत.

किरण बाळू बुधावले (वय 23), सतीश देवबा बुधावले (19), अक्षय लक्ष्मण बुधावले (19), बाळू अंकुश बुधावले (20, सर्व रा. बुधावलेवाडी) व अजय श्रीरंग जाधव (27,  रा.चिंचणी सर्व ता. खटाव) अशी अटक केलेल्या टोळीतील संशयितांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, सातारा-पुसेगाव रस्त्यावर विसापूर फाट्यावर काही संशयित दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला समजली. त्यानुसार दि. 8 रोजी पोलिसांनी सापळा लावला असता त्यामध्ये वरील सर्व संशयितांना पकडण्यात आले. पोलिसांनी संशयितांकडे चौकशी  केली असता त्यांच्याकडून दोन तलवारीसह मिरची पूड व इतर दरोड्याचे साहित्य आढळले.

संशयितांकडे कसून चौकशी केली असता त्यांनी टोळीच्या माध्यमातून कास, कण्हेर धरण, मेढा परिसर तसेच गणपतीचा माळ, ता.खटाव येथे पर्यटक व प्रेमी युगुलांची लुटमार करुन त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू, रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतले असल्याच्या 9 गुन्ह्यांची तर घरफोडी केलेल्या 3 गुन्ह्यांची कबुलीही दिली. याशिवाय नेर, डिस्कळ ता.खटाव, आंद्रुड ता. फलटण, स्वारगेट एसटी स्टँड येथील 4 पल्सर, 1 स्प्लेंडर अशा 5 दुचाकी चोरल्या. शेतीवरील इलेक्ट्रीक मोटारी व निर्जन परिसरात एकट्याला गाठून अनेक जबरी चोरी केल्याची कबुलीही संशयित चोरट्यांनी दिली. पोलिसांनी सर्व गुन्ह्यांची खातरजमा केली असता एकूण 25 गुन्ह्यांची कबुली संशयित चोरट्यांनी दिली आहे. दरम्यान, ही टोळी प्रथमच पोीलसांच्या रेकॉर्डवर आली आहे.

पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि पद्माकर घनवट, फौजदार प्रसन्न जर्‍हाड, शशिकांत मुसळे पोलिस हवालदार सुरेेंद्र पानसांडे, विजय जाधव, मोहन घोरपडे, विजय शिर्के, तानाजी माने, कांतीलाल नवघणे, रामा गुरव, विजय कांबळे, संतोष पवार, शरद बेबले, प्रवीण फडतरे, नितीन गोगावले, निलेश काटकर, अर्जुन शिरतोडे, विक्रम पिसाळ, मोहसीन मोमीन, प्रमोद सावंत, संजय जाधव, विजय सावंत, गणेश कचरे यांनी कारवाईत सहभाग घेतला.