Fri, May 29, 2020 18:17होमपेज › Satara › राजम्याने आणले शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी

राजम्याने आणले शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी

Published On: Sep 25 2019 1:47AM | Last Updated: Sep 24 2019 8:34PM
पिंपोडे बुद्रुक : कमलाकर खराडे

उत्तर कोरेगाव तालुक्यात खरीप हंगामात घेतले जाणारे प्रमुख पीक घेवडा (राजमा) हे असून सध्या या राजम्याने शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.  अति पावसामुळे पीक वाया गेले आहेच. पण त्याशिवाय कसे बसे तग धरुन बचावलेल्या या पिकाला बाजारभाव नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी पुरता हतबल झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. 

उत्तर कोरेगाव तालुक्याची ओळखच मुळात दुष्काळी भाग म्हणून आहे. इथे निसर्गाच्या जीवावर शेती केली जाते. या निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सातत्याने बळीराजाला बसत असतो. मात्र न डगमगता तो पुन्हा नव्याने उभा राहतो. या परिसरात खरीप हंगामात घेवडा हे पीक प्रामुख्याने घेतले जाते. वास्तविक वाघा घेवडा हा मूळ वाण परंतू काळाच्या ओघात तो कालबाह्य झाला. त्याची जागा आता वरुण घेवडा या कमी कालावधीत अधिक उत्पन्न देणार्‍या संकरित वाणाने घेतली आहे. गेल्या दहा वर्षात घेवड्याच्या दरात मोठी उलथापालथ झाली आहे. दर स्थिर राहत नसल्याने उत्पन्न घेऊनही शेतकर्‍यांच्या पदरी कायम निराशा येत आहे. घेवड्याच्या या परिस्थितीला कंटाळून अनेक शेतकरी वाटाणा या पिकाकडे वळले आहेत. पण तिथेही फारसे हाती काही लागत नसल्याचे चित्र आहे.

यावर्षी उत्तर कोरेगाव तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. नद्या-नाले खळाळून वाहत आहेत. जलयुक्‍त शिवारच्या माध्यमातून झालेल्या कामांचा चांगला फायदा झाल्याची परिस्थिती आहे. मात्र यावर्षी झालेल्या अनपेक्षित पावसाने शेतीचे व पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. खरीप हंगामातील घेवडा, वाटाणा, सोयाबीन, बटाटा या पिकांबरोबरच कडधान्येही वाया गेली आहेत. वाटाण्याचे पीक तर पूर्णपणे नासुन गेले. वरुण घेवड्याचे कसेबसे वाचलेले पीक काढताना शेतकर्‍यांची दमछाक होत आहे. एकरी आठ ते दहा पोती मिळणारे उत्पन्न एक ते दोन पोत्यावर आले आहे. अनेक शेतकर्‍यांना तर केलेला खर्च सुध्दा पदरात पडत नसल्याचे चित्र आहे. उत्पादनात प्रचंड घट असताना दुसर्‍या बाजूला बाजारभावही गडगडले आहेत.

व्यापारी शेतकर्‍यांची गळचेपी करत असल्याचे दिसून येत आहे. रंग, आकार, मालात असलेला ओलसरपणा, याशिवाय ठराविक रकमेचा व्यवहार झाल्यास व्यापार्‍यांना भरावा लागणारा जीएसटी अशी कारणे देऊन कवडीमोल दाराने घेवडा खरेदी केला जात आहे. सध्या घेवड्याला प्रति क्‍विंटल साडे तीन ते चार हजार दर दिला जात आहे. त्यातून त्याने केलेला खर्चही पदरी पडत नाही. एकंदर पावसाने झोडपले आणि राजाने मारले तर तक्रार कुणाकडे करायची अशी अवस्था शेतकर्‍यांची होवून बसली आहे. 

घेवड्यास (राजमा) दिल्‍ली, पंजाब व काश्मीरमध्ये मोठी मागणी असते. त्याचबरोबर या पिकाचे उत्पादन मर्यादित असते. घेवड्याची काढणी सुरु  झाल्यावर दिल्‍लीतील व्यापारी सातार्‍यात तळ ठोकून असतात. खरेदीसाठी मोठी स्पर्धा असते. मग तरीही दर मात्र कायम जेमतेमच असतो. शासनाने राजम्याला हमीभाव देण्याची मागणी शेतकरी सातत्याने करत आहेत.त्याकडे सरकार कायम दुर्लक्ष करत आहे.

परतीच्या पावसाचे गेल्या दोन दिवसांपासून तांडवनृत्य सुरू आहे. अचानक येणार्‍या पावसामुळे काढणीला आलेल्या पिकाचे मोठे नुकसान होत आहे. अगोदर सततच्या पावसामुळे शेतातील भांगलणीची कामे करता आली नव्हती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तण वाढले आहे. ती कामे उरकण्यात शेतकरी व्यस्त असताना आता परतीचा पाऊस धुमाकूळ घालू लागल्याने शेतकर्‍यांचे कंबरडे मोडल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.