Wed, Feb 26, 2020 21:21होमपेज › Satara › वहीवरच केला जातोय श्रीगणेशा : दफ्तराचे ओझे वाढले

शालेय साहित्यातून पाटी झाली हद्दपार

Published On: Jul 19 2019 2:18AM | Last Updated: Jul 18 2019 9:24PM
सातारा : मीना शिंदे

पूर्वीच्या काळी शिक्षणाचा श्रीगणेशा खापराची (दगडी) पाटी व त्यासोबत पांढरी पेन्सिलने होत असे. या दोन गोष्टींवर पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण पूर्ण होत होते. आज मात्र या दोघांचेही स्थान विद्यार्थ्यांच्या शिक्षणातून गायब झाले असून, दगडी पाटी तर कालबाह्यच झाली. नव्या शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्यांच्या हाती वहीवर श्रीगणेशा केला जात  असून चिमुकल्यांच्या पाठीवर दफ्तराचे ओझे मात्र दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. 

चौकोनी लाकडी रेखीव कडा व त्यामध्ये काळ्याभोर रंगाची पाटी व त्यावर उमटणारी सुंदर अक्षरे, या गोष्टी अतिशय वेगळेपण जोपासणार्‍या होत्या. आता मात्र हे सर्वकाही कथानकासारखे वाटत असून गेल्या आठ-दहा वर्षांत शिक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल झाल्याचे हे द्योतक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मुलांच्या प्राथमिक शिक्षणामध्ये दगडी पाटीची भूमिका अतिशय मोलाची ठरत होती. विद्यार्थ्यांना बाराखडी शिकवण्यापासून अंकओळख करुन देण्यापर्यंत या दगडी पाटीचा उपयोग होत होता. या दगडी पाट्या पाहवयास मिळणेही दुरापास्त झाले आहे. दगडी पाट्यांवर अक्षरांचा येणारा कोरीवपणा आता जणू गायबच झाला असून विद्यार्थी थेट वही, पेन अन् पेन्सिलचाच वापर करु लागल्याने दगडी पाटी म्हणजे काय रं भाऊ?असे म्हणायची वेळ आली आहे.

शाळेची पाटी हा प्रकार बाजारपेठेतूनच हद्दपार झाल्याने आता मुलांकडे कशा पाहायला मिळतील, हाही एक प्रश्नच आहे. गेल्या चार-पाच वर्षांत पुन्हा बाजारात आलेल्या फायबरच्या पाट्याही अलीकडच्या काळात दिसेनाशा झाल्या आहेत. शाळांमध्ये पाट्यांऐवजी विद्यार्थ्यांना नोटबुक नावाची गोंडस कागदी पाटी हाती टेकवली जात असून त्यावर बाराखडी व अंक लिहिण्यासाठी शिसपेन्सिल वापरली जाते.

विद्यार्थ्यांना वही व पेन याच्याच आधारे शिक्षणाची सुरुवात करण्याची नवी क्रेझ आली आहे. बालवाडीच्या प्रवेशासाठीच पालकांची घुसमट होते. प्रवेशानंतर इवल्याशा विद्यार्थ्यांच्या पाठीवर शिक्षणाच्या साहित्याचे वजन न पेलण्या इतपत वाढले आहे. पूर्व प्राथमिकपासूनच दफ्तरामध्ये कृतिपुस्तिका, प्रोजेक्ट  वह्या व समग्री, पाठ्यपुस्तके यांचे ओझे वाढत आहे. आता मात्र दगडी पाटी व पेन्सिल दोन्ही गायब झाले असून याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षरावर झाला आहे. आज डिझाईन क्षेत्राचा मुख्य घटक बनलेल्या कॅलिग्राफीचे मूळ हे दगडी पाटीच होते. आता त्याचाही अभाव नक्की जाणवणार आहे.

टोपीही हरवली....

प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना पूर्वी डोक्यावर गांधी टोपी घालणे बंधनकारक असे. आता शालेय गणवेशातून गांधी टोपीला वगळण्यात आल्याने ही गांधी टोपीही शाळेतून हरवली आहे. मात्र समाजात याची टोपी त्याला घालणार्‍या मनोवृत्ती मात्र दिवसेंदिवस वाढत आहेत.