Thu, Jun 27, 2019 15:47होमपेज › Satara › सुमारे ८० शिक्षकांना नोटीसा

सुमारे ८० शिक्षकांना नोटीसा

Published On: Aug 04 2018 10:28PM | Last Updated: Aug 04 2018 10:05PMसातारा : प्रतिनिधी

प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांच्या पार्श्‍वभुमीवर  ज्या शिक्षकांनी चुकीची माहिती देवून बदलीचा लाभ घेतला अशा सुमारे 80 हून अधिक शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने कारणे दाखवा नोटीसा बजावल्या आहेत. त्यामुळे संबंधित शिक्षकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

राज्याच्या ग्रामविकास विभागाने यावर्षीपासून प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या केल्या आहेत. मात्र झालेल्या बदल्यात अनेक शिक्षकांची गैरसोय झाली आहे. तर काही शिक्षकांनी पुणे विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. आयुक्तांकडे आलेल्या तक्रारींच्या पार्श्‍वभुमीवर शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेत सुनावणी घेतली होती. सुनावणीवेळी ऑनलाईन बदलीचे फॉर्म भरताना सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी अधिकार्‍यांनी केली. यामध्ये जिल्ह्यातील 80 हून अधिक शिक्षक जिल्हा परिषदेच्या रडारवर होते. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने अशा 80 शिक्षकांना कारणे दाखवा नोटीसा बजावल्या आहेत. या शिक्षकांनी चुकीची माहिती घेवून बदलीचा लाभ घेतला  असल्याने वेतनवाढ का थांबवण्यात येवू नये? विभागीय चौकशी का प्रस्तावित करण्यात येवू नये? अशा आशयाची नोटीस बजावण्यात आली असून  नोेटीसीवर त्वरित खुलासा करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी  व प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी सत्यजीत बडे व उपशिक्षणाधिकारी एच.व्ही.जाधव यांनी दिली.

दरम्यान, शिक्षण विभागाने शिक्षकांना नोटीसा बजावल्याने शिक्षकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तसेच एका शिक्षकाने अपंगाचे प्रमाणपत्र 50 हजार रूपये दिले की त्वरित मिळत असल्याचा आरोप केला होता. त्या शिक्षकांवरही सबळ पुरावे न देता जबाबदार यंत्रणेविरूध्द बेताल वक्तव्ये केल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली असल्याचे सत्यजीत बडे यांनी सांगितले.