Sat, Jul 20, 2019 09:00होमपेज › Satara › बदल्यांनंतर २०० हून अधिक तक्रारी 

बदल्यांनंतर २०० हून अधिक तक्रारी 

Published On: May 22 2018 10:40PM | Last Updated: May 22 2018 10:20PMसातारा : प्रतिनिधी

राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार जिल्हाअंतर्गत झालेल्या  बदल्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी असल्याने सुमारे 200 हून अधिक शिक्षकांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे तक्रारी केल्या असून त्या तक्रारी शिक्षण विभागामार्फत पुणे येथील ‘एनआयसी’कडे पाठविण्यात आल्या असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

प्राथमिक शिक्षण विभागाकडे  संगणक प्रणालीप्रमाणे बदल्या झाल्या नाहीत आणि झाल्या असतील तर त्याची यादी जाहीर व्हावी. सेवाज्येष्ठता डावलून ज्या बदल्या झाल्या आहेत त्या सेवाज्येष्ठतेनुसार व्हाव्यात. आजपर्यंतच्या  शासन निर्णयानुसार संवर्ग 1,2,3 ने खो  मिळालेल्या शिक्षकांच्या  प्रशासकीय बदल्या अगोदर करणे क्रमप्राप्त असताना विनंती  बदल्यांना प्राधान्य देऊन संबंधितांना  डावलल्याचे दिसून येते. दि. 27 फेब्रुवारी 2017 च्या निर्णयानुसार बदल्यांची कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही. वरिष्ठ शिक्षकांनी ज्या शाळा मागितल्या होत्या त्या कनिष्ठ शिक्षकांना मिळालेल्या आहेत. संवर्ग 1, 2 व 3 यांना मिळालेल्या जागा न दिसल्यामुळे संवर्ग 4 विस्थापितांची संख्या या अन्यायामुळे वाढली आहे.काही शाळांमध्ये शिक्षकांची दोन पदे आहेत. मात्र, त्या शाळेवर तीन आदेश आलेले आहेत. शिक्षक पती पत्नीमध्ये 30 किलोमीटरपेक्षा कमी अंतर असताना त्यांचे एकत्रीकरण झाले आहे. बोगस अपंग संख्या मोठी असून त्रयस्थ यंत्रणेकडून त्याची फेरतपासणी झालेली नाही तर बर्‍याच शिक्षक दाम्पत्यांचे एकत्रीकरण न होता 60 किलोमीटरपर्यंत अंतर झाले आहे. पती-पत्नी एकत्रीकरणासाठी शासन निर्णयाचे पालन झालेले नाही. समानीकरणाची पदे रिक्त ठेवायची असताना त्यापदावर शिक्षक हजर झाले आहेत. 

गतवर्षी हजर झालेल्या शिक्षकांची जिल्ह्यातील सेवा बदलीप्राप्त नसताना त्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पदवीधरांची विषय गटानुसार नेमणुकांमध्ये अनियमितता दिसून येते.विषय शिक्षकांच्या नियुक्त्या न करताच शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.  शिक्षकांनी सादर केलेली माहिती ऑनलाईन न पडताळणे, बंद शाळांवर  शिक्षकांच्या बदल्या, पती-पत्नी एकत्रीकरणात त्रुट्या, दोन शिक्षकी शाळांवर अतिरिक्त शिक्षकांच्या नेमणुका अशा तांत्रिक चुका या बदल्यामध्ये झाल्या आहेत याबाबतच्या तक्रारी देण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून जिल्हा परिषदेत गर्दी केली आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे सुमारे 200 हून अधिक शिक्षकांनी तक्रारी दाखल केल्या असून त्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी ‘एनआयसी’ पुणे येथे पाठविण्यात आल्या असल्याची माहिती उपशिक्षणाधिकारी एच.व्ही. जाधव यांनी दिली.