Fri, Jan 18, 2019 08:55होमपेज › Satara › औंध येथे भाविकांना लुटणार्‍या टोळीला ‘मोका’

औंध येथे भाविकांना लुटणार्‍या टोळीला ‘मोका’

Published On: Jul 15 2018 1:30AM | Last Updated: Jul 14 2018 10:23PMसातारा : प्रतिनिधी

औंध येथे भाविकांना लुटणार्‍या तिघांच्या टोळीवर जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी संघटित गुन्हेगारी तथा ‘मोकां’तर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे. बाळ्या जाधवची ही टोळी असून, या कारवाईने पर्यटनस्थळी लूटमार करणार्‍या टोळ्या रडारवर आल्या आहेत. दरम्यान, या टोळीने वडूज, दहिवडी, सातारा तालुका व राजगड येथेही धुडगूस घातला असल्याचे समोर आले आहे.

बाळू गिरजाप्पा जाधव, विशाल अशोक मदने (दोघे रा.महिमानगड ता.माण) व विशाल कैलास पाटोळे (रा.औंध ता.खटाव) या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहेे.
याबाबत अधिक माहिती अशी, औंध येथील देवस्थान परिसरात संशयित तिघांनी लूटमार केली होती. दि. 21 मे 2018 रोजी दुपारी औंध येथील यमाईदेवी मंदिरात बाळू जाधव व विशाल मदने या दोघांनी जोडप्याला लुटले होते. चोरट्यांनी यावेळी रोख 5 हजार 50 रुपये व 14 हजार रुपये किमतीचा मोबाईल जबरीने चोरुन हिसकावून घेतला होता. याप्रकरणी पोलिसांच्या तपासामध्ये संबंधित टोळी दरोडा, जबरी चोरी, मारामारी, खुनाचा प्रयत्न करत असल्याचे समोर आले.  त्यानंतर सपोनि सुनील जाधव यांनी मोक्कांतर्गत प्रस्ताव तयार करण्यास हालचाली सुरु केल्या. मोक्काचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक कार्यालयात आल्यानंतर तो पुढे विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयात पाठवण्यात आला व त्याला नुकतीच मंजुरीही मिळाली. या मोक्काचा तपास पोलिस उपअधीक्षक यशवंत काळे हे करत असून या टोळीच्या स्थावर व जंगम मालमत्तेची माहिती घेऊन या संघटित टोळीविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे.