होमपेज › Satara › अपंगत्वाच्या दाखल्यासाठी ‘बाजार’

अपंगत्वाच्या दाखल्यासाठी ‘बाजार’

Published On: Aug 31 2018 1:43AM | Last Updated: Aug 30 2018 11:46PMसातारा : प्रतिनिधी

अपंगत्वाचा दाखला मिळवून देतो, असे सांगून वेळोवेळी तब्बल 92 हजार रुपये घेऊन फसवणूक  करणार्‍या बाळकृष्ण नामदेव नारवनकर (मूळ रा. रणशिंगवाडी, ता. खटाव, सध्या रा. कृष्णानगर, सातारा) याचा सिव्हिलमध्येच पर्दाफाश करण्यात आला. या घटनेमुळे रुग्णालयात काही काळ गोंधळ उडाला. शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याला ताब्यात घेतले असून, पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहेे. दरम्यान, संशयितावर अशाच प्रकारचे काही गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

संतोष रामचंद्र फडतरे (वय 21, रा. गुरुवार पेठ) यांनी याबाबतची तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संतोष यांचे वडील अपंंग असून जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्हिल) अपंगत्वाचा दाखला घेण्यासाठी ते मे 2015 मध्ये गेले होते. त्यावेळी संशयित सिव्हिलमध्येच थांबलेला होता. फडतरे पिता-पुत्र अपंगत्वाबाबत प्रोसिजर करत असताना संशयिताने ओळख करून मोबाईल क्रमांक व घरचा पत्ता विचारून घेतला. रुग्णालयातून दोघे बाहेर पडल्यानंतर दुसर्‍या दिवशी संशयित बाळकृष्ण नारवनकर याने तक्रारदार संतोष फडतरे यांना फोन करून भेटायचे असल्याचे सांगितले.    

संशयित तक्रारदार यांच्या घरी भेटायला गेला व त्याने ‘तुम्हाला अपंगत्वाचा दाखला मी मिळवून देतो. माझी ओळख असून त्यासाठी पैसे द्यावे लागतील,’ असे सांगितले. संशयिताने सर्व प्रक्रिया सांगितल्यानंतर तक्रारदार यांनी सुरुवातीला 35 हजार रुपये दिले. पैसे मिळाल्यानंतर काम अंतिम टप्प्यात आले असल्याचे सांगून पुन्हा 57 हजार रुपये मागून घेतले. अशाप्रकारे वेळोवेळी तक्रारदार यांनी संशयिताला एकूण 92 हजार रुपये दिले.

अपंगत्वाचा दाखला मिळण्यासाठी पैसे दिल्यानंतर मात्र दाखला मिळत नसल्याने तक्रारदार यांनी त्याबाबत वारंवार विचारणा केली. पैसे व दाखला मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे तक्रारदार यांच्या लक्षात आले. गुरुवारी सकाळी तक्रारदार हे सिव्हील रुग्णालयात आले होते. यावेळी संशयित बाळकृष्ण नारवनकर हा दिसताच तक्रारदार यांनी त्याला फैलावर घेतले. अपंगत्वाचा दाखल नको सर्व पैसे माघारी द्या, असे म्हणताच संशयित गडबडला. या घटनेमुळे सिव्हील रुग्णालयात खळबळ उडाली. तू तू मै मै झाल्यानंतर या घटनेची शहर पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी सिव्हीलमध्ये जावून संशयिताला ताब्यात घेतले.

संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर तक्रारदार यांनी शहर पोलिस ठाण्यात जावून घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयित बाळकृष्ण नारवणकर याच्याविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. संशयिताने यापूर्वीही अशाचप्रकारे कृत्य केल्याने त्याच्यावर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

रॅकेटचा पर्दाफाश करण्याचे ‘सीएस’समोर आव्हान

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमोद गडीकर यांनी सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयाचा नुकताच चार्ज घेतला आहे. सिव्हील रुग्णालय गरीबांचे असताना याठिकाणी काही अपप्रवृत्तीनी अक्षरश: धुडगूस घातला आहे. तथाकथित समाजसेवक, दादा लोकांनी आपली दहशत वापरुन सर्व यंत्रणेला पोखरलेले आहे. बिनधोकपणे अपंगत्वाचा दाखला देण्यासाठी चक्क 92 हजार रुपये घेतल्याने याची पाळेमुळे खोलवर असल्याचे स्पष्ट आहे. यामुळे जिल्हा शल्यचिकित्सांनी सर्व विभागाचा आढावा घेवून पैसे घेवून काम करणार्‍यांचा पर्दाफाश करण्याची गरज निर्माण झाली आहे. अपंगत्वाच्या दाखल्याच्या निमित्ताने पोलिस व सीएस यांनी या मुळाशी जावून या संशयित बाळकृष्ण नारवणकर याच्या संपर्कात कोण कोण आहे? गेल्या किती वर्षापासून हे रॅकेट कार्यरत आहे? आतापर्यंत पैसे घेवून किती दाखले दिली? बोगस अपंगत्वाचे दाखले दिले आहेत का? असे सर्व प्रश्‍न उपस्थित झाले असून त्याची पोलखोल करण्याची गरज निर्माण झाली आहे.