Sat, Aug 24, 2019 21:34होमपेज › Satara › बाजार समित्यांचे ‘आमदनी अट्ठन्‍नी खर्चा रुपय्या’

बाजार समित्यांचे ‘आमदनी अट्ठन्‍नी खर्चा रुपय्या’

Published On: Jun 19 2018 1:23AM | Last Updated: Jun 18 2018 10:43PMसातारा : महेंद्र खंदारे

सातारा जिल्ह्यामध्ये 10 कृषी उत्पन्‍न बाजार समित्या कार्यरत असून प्रत्येक तालुक्यातील कोणत्या ना कोणत्या पक्षाचा नेता अथवा कार्यकर्ते या समितीवर विविध पदांवर कार्यरत आहेत. काही बाजार समितीतील राजकीय नेतेमंडळींच्या उधळपट्टीमुळे गत तीन वर्षांत जिल्ह्यातील 4 बाजार समित्या सुमारे 20 लाखांनी तोट्यात गेल्या आहेत. बाजार समित्यांच्या कारभाराची गेल्या तीन वर्षांची आकडेवारी पाहता जिल्ह्यातील दहिवडी, जावली, कोरेगाव, वडूज आणि लोणंद या बाजार समित्यांचा खर्च उत्पन्‍नापेक्षा अधिक झाल्याने ‘आमदनी अठ्ठन्‍नी खर्चा रुपय्या’ अशी म्हणायची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. या आकडेवारीवरून कृषी उत्पन्‍न बाजार समित्या किती पाण्यात आहेत हे लक्षात येते. 

जिल्ह्यामध्ये सातारा, कराड, फलटण, लोणंद, वाई, दहिवडी, जावली, वडूज, पाटण आणि कोरेगाव येथे कृषी उत्पन्‍न बाजार समिती आहे. यामध्ये 4 बाजार समित्या तोट्यात आहेत. बाजार समित्यांना विविध शेतमालाचे लिलाव, प्लॉट भाडे, गाळे भाडे, सेस, प्रवेश फी, भाडे पावती या माध्यमातून उत्पन्‍न मिळते तर व्यापार्‍यांसाठी कट्टे करणे, विजेची सोय  करणे, इमारत बांधणे, अंतर्गत रस्ते करणे, शेड मारणे, गोडावून बांधणे, शेतकर्‍यांना सुविधा देणे यासाठी पैसे खर्च केले जातात; परंतु 1-2 बाजार समित्या वगळता कोणत्याच बाजार समितीमध्ये जास्त सुविधा दिसून येत नाहीत.

माण तालुक्यातील दहिवडी बाजार समितीला 2015-16 मध्ये 31 लाख 47 हजार 570 रूपये उत्पन्‍न झाले. त्यापैकी 31 लाख 16 हजार 766 रूपये खर्च झाला. यावर्षी बाजारसमितीला अवघा 30 हजार 804 रूपये फायदा झाला. 2016-17 मध्ये उत्पन्‍न घटून 28 लाख 20 हजार 590 झाले. तर खर्च तब्बल 36 लाख 9 हजार 264 झाला. त्यामुळे यावर्षात तब्बल 6 लाख 88 हजार 674 रूपये तोटा झाला. 2017-18 मध्येही उत्पन्‍न जेमतेमच राहिले असून 29 लाख 24 हजार 368 रूपये झाले. तर खर्च मात्र 34 लाख 11 हजार 582 रूपये झाला. त्यामुळे तीन वर्षांचा सारासार विचार करता तब्बल 11 लाख 45 हजार 84 रूपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे. 

जावली बाजार समितीलाही तीन वर्षात उतरती कळा लागली आहे. 2015-16 मध्ये 14 लाख 99 हजार 561 रूपये उत्पन्‍न झाले. यावर्षी 18 लाख 85 हजार 944 रूपये खर्च झाला. उत्पन्‍नापेक्षा खर्च जास्त झाल्याने 3 लाख 86 हजार 383 रूपयांचा तोटा झाला. 2016-17 मध्ये उत्पन्‍न घटून 14 लाख 93 हजार 910 झाले. तर खर्च तब्बल 17  लाख 84 हजार 522 झाला. त्यामुळे यावर्षातही 2 लाख 90 हजार 612 रूपये तोटा झाला. 2017-18 मध्ये उत्पन्‍नात वाढ पहायला मिळाली.  16 लाख 95 हजार 84 रूपये उत्पन्‍न झाले तर 16 लाख 93 हजार 979 रूपये खर्च झाला. त्यामुळे अवघा 1 हजार 105 रूपयांचा फायदा झाला आहे.  त्यामुळे तीन वर्षांचा सारासार विचार करता तब्बल 6 लाख 75 हजार 890 रूपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे. 

कोरेगाव बाजार समितीला 2015-16 मध्ये 40 लाख 77 हजार 474 रूपये उत्पन्‍न झाले असून 45 लाख 85 हजार 251 रूपये खर्च झाला. यावर्षी बाजारसमितीला 5 लाख 7 हजार 777 रूपयांचे नुकसान सहन करावे लागले. 2016-17 मध्ये उत्पन्‍न 41 लाख 26 हजार 957 झाले. तर खर्च तब्बल 48 लाख 31 हजार 643 झाला. त्यामुळे यावर्षात तब्बल 7 लाख 64 हजार 686 रूपये तोटा झाला. 2017-18 मध्ये उत्पन्‍न तब्बल दीडपटीने वाढून 70 लाख 45 हजार रूपये झाले. तर खर्चही 58 लाख 37 हजार 986 रूपये झाला. त्यामुळे या वर्षात 12 लाख 4 हजार 574 रूपयांचा फायदा झाला. परंतु, तीन वर्षांची सरासरी काढला तर 68 हजार रूपयांचा तोटा सहन करावा लागला. 

लोणंद बाजारसमिती जिल्ह्यात नावाजली जाते. या ठिकाणी मोठया प्रमाणात उलाढाली होत असल्याने लोणंदचे मोठे नाव आहे. या बाजार समितीत 2015-16 ला 95 लाख 57 हजार 445 रूपये उत्पन्‍न झाले. तर खर्च 81 लाख 57 हजार 558 रूपये झाला. यावर्षी बाजारसमितीला 11 लाख 99 हजार 887 रूपये फायदा झाला. परंतु त्यानंतर पुढील दोन वर्षात बाजार समितीची कामगिरी ढासळली आहे. 2016-17 मध्ये उत्पन्‍न घटून 75 लाख 82 हजार 292 वर गेले आणि खर्च 70 लाख 51 हजार 893 रूपये झाला. त्यामुळे या वर्षी 3 लाख 69 हजार 601 रूपये तोटा सहन करावा लागला. 2017-18 मध्ये उत्पन्‍न पुन्हा वाढून 91 लाख 62 हजार रूपये झाले. तर खर्च 92 लाख 64 हजार 758 रूपये झाला. यावेळी 1 लाख 2 हजार 756 रूपयांचे नुकसान सहन करावे लागले.