Thu, Apr 18, 2019 16:26होमपेज › Satara › दगडफेक करणार्‍यांवर दंगलीचा गुन्हा

दगडफेक करणार्‍यांवर दंगलीचा गुन्हा

Published On: Jul 27 2018 1:26AM | Last Updated: Jul 27 2018 1:26AMसातारा : प्रतिनिधी

राजधानी सातार्‍यातील मराठा क्रांती ठोक मोर्चा व ठिय्या आंदोलनानंतर आंदोलकांसह काही समाजकंटकांनी महामार्ग रोखून जाळपोळ, तोडफोड केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात दंगल घडवल्याप्रकरणी गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. यामध्ये 55 जणांना अटक करून जिल्हा न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. 

अटकेतील  खर्‍या आंदोलकांसाठी कोर्टात सुमारे दीडशे वकिलांची फौज सज्ज झाली असून, मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीही गुरुवारी दिवसभर कोर्टात ठाण मांडून होती. दरम्यान, बुधवारी झालेल्या तोडफोडीत सुमारे 25 लाखांचे नुकसान झाले असून, एकूण 32 पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांना गंभीर, किरकोळ दुखापत झाली असल्याचे समोर आले आहे.

निखिलेश मस्के, सचिन माने, संभाजी गंभीर, किरण जाधव, वैभव नाळे, चंद्रकांत जगदाळे, सोमनाथ जठार, विक्रम साळुंखे, धनंजय काळभिरे, प्रशांत मोहिते, विशाल डोईफोडे, गणेश चव्हाण, अक्षय जगताप, प्रथमेश विजय गोडसे, अमीर खान, योगेश नाईकनवरे, विक्रांत रणदिवे, दयानंद सोनकांबळे, आशिष बोंद्रे, मोहन पवार, विक्रम पाचांगणे, नितीन जगताप, किशोर कांबळे, मयूर  मिरगे, किशोर निकम, मेघराज देशमुख, मयूर तगड, गणेश कदम, प्रवीण फाळके , हणमंत गोडसे, गणेश पडवळ, अक्षय आद्रड,  संदीप कोळपे, प्रवीण देशमुख, निकेत कुंभार, तेजस शिंदे, मंगेश चव्हाण, शिवाजी शेडगे, आनंद देशमुख, गणेश देखमुख, नरेन देशमुख, विशाल भोसले, निखिल भोसले, गोविंद काळभोर, शुभम भोसले, सौरभ भोसले, सुयश दडस, रोहित चव्हाण, संयोग कुंभार, विजय घाटे, योगेश आवळे, धनंजय हेंद्रे, प्रविण फडतरे (सर्व रा. सातारा शहर परिसर) यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहेत. याशिवाय 18 अल्पवयीन संशयीत मुलांना ताब्यात घेवून बालसुधार गृहात रात्रीच त्यांची रवानगी केली. गुन्ह्यात निष्पन्‍न झालेल्यांची नावे आणखी वाढणार असून त्यांचा शोध सुरु आहे. याप्रकरणी फौजदार नानासाहेब कदम यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

बुधवारी रात्री उशीरापर्यंत पोलिसांनी सुमारे 70 जणांना ताब्यात घेतले होते. संबंधितांची चौकशी केली असता गुरुवारी सकाळपर्यंत 55 जणांचा दंगलीत सहभाग आढळला. याशिवाय पोलिसांनी केलेले, शुटींग फोटो याची खातरजमा केली असता त्यातून आणखी अनेकांची नावे समोर येणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

दरम्यान, बुधवारी रात्री उशीरापर्यंत 55 जणांना अटक करुन गुरुवारी जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी बचाव व सरकार पक्षाच्यावतीने जोरदार युक्‍तिवाद केला. पोलिसांनी संशयित अटक आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी मिळण्याची न्यायाधिशांना विनंती केली. यावर बचाव पक्षाच्यावतीने 125 मराठा वकिलांनी न्या. माने यांच्यासमोर युक्तीवाद केला. अटक केलेल्या आंदोलकांचा या घटनेशी काडीमात्र संबंध नसतानाही पोलीसांनी 18 अल्पवयीन मुलांसह निरापराधारांना अटक केली आहे. ताब्यात घेतलेल्या सर्वांना घटनास्थळावरुन अटक केलेली नाही. पोलिसांनी कॉलेजच्या मुलांना रस्त्याने जाताना, कॉलेज परिसरातून तसेच ऑफीसमध्ये काम करणार्‍यांचीही उचलबांगडी केली आहे. याशिवाय काही मुले परीक्षा देवून घरी निघाली होती. दुर्देवाने मात्र पोलिसांनी त्या मुलांवर काठीने गंभीर मारहाण करीत अटक केली आहे. पोलीसांनी संशयितांवर 307 सारख्या चुकीच्या पध्दतीने गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत. या निरापराध मुलांचा उद्देश आंदोलन व दगडफेक करण्याचा नव्हता याचे पुरावेही वकिलांनी न्या. माने यांच्यासमोर युक्तीवाद करताना सादर केले. दोन्ही पक्षाचा युक्‍तिवाद ऐकल्यानंतर संशयितांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

आंदोलकांना न्यायालयात हजर करतेवेळी न्यायालय परिसरात मोठ्या प्रमणात गर्दी होती. कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलिसांचाही चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच संशयित आंदोलकांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांची सातारा जिल्ह्यासह कोल्हापूर कारागृहात (जेल) रवानगी करण्यात आली आहे.

मराठा आंदोलनाशी काडीमात्र संबध नसताना पोलीसांनी अटक केलेल्या निरपराधांना व बालसुधार गृहातील 18 संशयीतांना सोडवण्यासाठी  मराठा वकिलांची फौज खंबीरपणे पाठीशी उभी राहिली होती. सकाळपासून या वकिलांना मराठा क्रांती मोर्चाचे समन्वय न्यायालयात उपस्थित राहून सहकार्य करीत होते. मराठा मोर्चाप्रमाणे न्यायालयातही मराठा एकीचे दर्शन आज दिवसभर घडले.

कराड शहर परिसरातील 32 आंदोलकांवर गुन्हा

कराड : प्रतिनिधी

मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे यासह विविध मागण्यांसाठी मराठ्यांनी केलेल्या आंदोलनाला बुधवारी हिंसक वळण लागल्याने जमावाने जाळपोळ करून विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी कराड शहर परिसरातील गोटे व ओगलेवाडी येथे आंदोलन करणार्‍या सुमारे 32 आंदोलकांवर गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी बंदच्या काळात टायर पेटवून रस्त्यावर टाकल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. 

मराठ्यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर ठोक मोर्चा आंदोलन सुरू केले आहे. याच मागणीसाठी बुधवारी जिल्हा बंदची हाक मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आली होती. या बंद काळात आक्रमक झालेल्या मराठा युवकांनी ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले. गोटे येथील टायर दुकानासमोर पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या सर्व्हिस रस्त्यावर टायर पेटवून रस्ता रोखण्याचा प्रयत्न करणार्‍या 10 ते 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी तेथीलच टायर दुकानदारास दमदाटी करत दुकानाशेजारी पडलेले जुने टायर रस्त्यावर पेटवून रास्ता रोको केला होता. हा प्रकार दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडला होता. याबाबत राम परशुराम पाटील यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यावरून जमावबंदी व शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन करून बेकायदा जमाव करून पाच मोटरसायकलवरून आलेल्या अज्ञात युवकांवर शहर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक रूपाली चव्हाण करत आहेत.

दरम्यान, ओगलेवाडी येथील रेल्वे पूलावर आंदोलनाच्या कालावधीत टायर पेटवून रास्तारोको करण्यात आला होता. मात्र, पोलिस घटनास्थळी त्वरीत पोहचल्याने त्यांनी पेटता टायर बाजूला करून वाहतुक सुरळीत केली होती. याप्रकरणी अज्ञात  15 ते 20 जणांवर शहर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. याबाबतची फिर्याद हवालदार सचिन काशिद यांनी दिली आहे. अधिक तपास ओगलेवाडी दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करत आहेत.