होमपेज › Satara › मानेवाडीत तलाठ्यानेच चोरली विहीर

मानेवाडीत तलाठ्यानेच चोरली विहीर

Published On: May 25 2018 11:36PM | Last Updated: May 25 2018 10:52PMसातारा : प्रतिनिधी

मानेवाडी, म्हसवड, (ता. माण) येथील शेतकरी गणपत शंकर पडळकर यांनी शेतामध्ये  खोदलेली विहीर 7-12 वर नोंद असतानाही उतारा पुस्तकावर खाडाखोड करून चिकटपट्टी चिकटवून नोंद रद्द करणार्‍या तलाठी यु. व्ही. परदेशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असून गुन्हा दाखल न झाल्यास 1 जून रोजी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. तसेच तो तलाठी संघटनेचा तालुकाध्यक्ष असल्याने त्याला अधिकारी पाठीशी घालत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

गणपत पडळकर यांनी प्रांताधिकारी यांना दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की 27/6/2015 रोजी माझ्या मालकीची जमीन सर्वे नं - 584/6 (3 आणे 3 पै ) मध्ये स्वतः कष्टाने विहीर पाडली आहे. त्याची 7-12 वर नोंद केली होती. तो उतारा आजरोजी सुद्धा माझ्याकडे उपलब्ध आहे. माझी आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने 2016 मध्ये बँकेकडे शेतकरी कर्ज घेण्यासाठी गेलो असता बँकेने नवीन 7-12 उतारा व इतर कागदपत्रे मागितली म्हणून म्हसवड तलाठी कार्यालयात नवीन उतारा काढण्यासाठी गेलो असता तेव्हाचे तलाठी अक्कडमल यांनी तुमची विहिरीची 7-12 वरील नोंद मी येण्यापूर्वीच पूर्वीचे तलाठी यु.व्ही.परदेशी यांनी रद्द केली आहे ती का रद्द केली आहे त्याविषयी मला माहिती नाही. मी तुम्हाला विहीर नोंद असलेला 7-12 देऊ शकत नाही. नोंद रद्द केलेला उतारा मी देऊ शकतो असे सांगून त्याप्रमाणे त्यांनी मला नोंद रद्द केलेला उतारा दिला. त्यांनी मला 7-12 उतारा पुस्तकात खाडाखोड करून चिकटपट्टी चिकटवून नोंद रद्द केली आहे,  असे सांगितले, अशी माहिती पडळकर यांनी निवेदनात दिली आहे.

त्यानंतर मी माझा म्हसवड पोलिस ठाणे, तहसीलदार माण तसेच प्रांताधिकारी माण-खटाव, उपविभागीय पोलिस अधिकारी दहिवडी यांच्याकडे परदेशी तलाठी यांच्या विरुद्ध कलम 420, 468, 471 प्रमाणे  फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी तक्रारी अर्ज दिले,  परंतु, कोणीही मला गरिबाला साथ दिली नाही. त्यानंतर तहसीलदारांना या अर्ज प्रकरणांची  चौकशी करून मी 7-12 वर विहीर नोंद करण्याची विनंती केली. यावर तहसीलदारांनी स्वतः मला नोंद करून दिली. परंतु, तलाठी परदेशी यांच्यावर कारवाई झाली नाही. सरकारी ( 7-12 पुस्तकात ) खाडाखोड करून चिकटपट्टी लावून माझ्या नावाची विहीर नोंद तलाठी परदेशी यांनी विनाकारण रद्द करून मला शारीरीक व मानसिक त्रास दिला तसेच माझे खूप मोठे नुकसान केल्याने माझी आर्थिक परिस्थिती पूर्णपणे ढासळली आहे. तरी आता तलाठी परदेशी यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंद करावा. जर आपण गुन्हा नोंद केला नाही तर 1 जून रोजी मी स्वतः तलाठी कार्यालय येथील लिंबाच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या करणार आहे, असे पडळकर यांनी निवेदनात म्हटले आहे.

  मी वेळोवेळी प्रांत , तहसीलदार, जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करूनही काहीही फरक पडला नाही. तो तलाठी संघटनेचा तालुकाध्यक्ष असल्याने त्याला अधिकारी पाठीशी घालत आहेत. माझ्या आत्महत्येस तलाठी परदेशी यांना जबाबदार धरण्यात यावे तसेच महसूल विभागातील नायब तहसीलदार पोटे, सर्कल जगताप यांच्यावर गुन्हा नोंद करावा, अशी मागणीही पडळकर यांनी निवेदनात केली आहे.

महसूलच्या अधिकार्‍यांकडून पाठराखण का? 

गणपत पडळकर यांच्या विहिरीची पहिल्यांदा 7-12 वर नोंद करून ती पुन्हा खाडाखोड करून रद्द केली आहे.  या बदलाचे दोन्ही मूळ 7-12 उतारे गणपत पडळकर यांच्याकडे असून एवढा मोठा पुरावा असतानाही अधिकारी कारवाई का करत नाहीत, असा सवाल उपस्थित केला जात आहे.