Sat, Jun 06, 2020 00:14होमपेज › Satara › उमेदवारांना एकाचवेळी लढता येणार लोकसभा, विधानसभा

उमेदवारांना एकाचवेळी लढता येणार लोकसभा, विधानसभा

Published On: Sep 26 2019 2:28AM | Last Updated: Sep 25 2019 11:35PM
सातारा : प्रतिनिधी

सातारा लोकसभा पोटनिवडणूक तसेच जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघाची निवडणूक इच्छुक उमेदवारांना एकाचवेळी लढता येणार आहे. त्यामुळे निवडणूक रिंगणात उमेदवारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघासोबतच लोकसभेची पोट निवडणूक जाहीर झाली आहे. गत लोकसभा निवडणुकीस नऊ उमेदवार रिंगणात होते. तीन महिन्यांनी पुन्हा लोकसभेची पोट निवडणूक लागल्याने या निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याचे   अनेकांनी मनसुबे आखले आहेत. त्यामुळे पोट निवडणुकीत निवडणूक लढवणार्‍यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.  लोकसभेपेक्षा विधानसभेला इच्छुकांची संख्या जास्त राहण्याची शक्यता आहे. प्रमुख पक्षांतील कार्यकर्त्यांनी काहीही झाले तरी यावेळी विधानसभा लढवायची असा चंग बांधला आहे. तर काहीजणांनी प्रस्थापितांना विरोध करुन अपक्ष म्हणूनही लढायची तयारी दाखवली आहे.

उमेदवारी डावलल्याने काही ठिकाणी बंडखोरीही होणार असल्याचे चित्र आहे. अशावेळी काही कार्यकर्त्यांनी मात्र लोकसभा आणि विधानसभा अशा दोन्ही निवडणुका लढवण्याचा निर्धार केला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांचे नामनिर्देशन हे निवडणूक संचालन नियम 1961 ला जोडलेल्या नमुना 2 क मध्ये सादर करण्यात येईल.

राज्य विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवाराचे नामनिर्देशन संबंधित नमुना 2 ख मध्ये दाखल करण्यात येईल. याबाबत असलेल्या नियमांनुसार दोन्हीही निवडणुका एकाचवेळी लढवता येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकाचवेळी लढण्याची कायद्यात तरतूद आहे.