Wed, Apr 24, 2019 16:31होमपेज › Satara ›  नोकरीच्या आमिषाने महिलेकडून फसवणूक

 नोकरीच्या आमिषाने महिलेकडून फसवणूक

Published On: Jun 21 2018 4:56PM | Last Updated: Jun 21 2018 4:56PMसातारा : प्रतिनिधी

सातारा नगरपालिकेच्या आरोग्य विभागात नोकरी लावण्याच्या बहाण्याने कोडोली येथील एकाची फसवणूक केल्याप्रकरणी प्रतिक्षा बाळकृष्ण भोसले (रा.गुरुवार पेठ, सातारा) या महिलेविरुध्द सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, नोकरी विकण्यासाठी साडेचार लाखाचा व्यवहार ठरल्यानंतर त्यातील 85 हजार रुपये संशयित महिलेला दिले असल्याचे तक्रारदार यांनी तक्रारीत म्हटले आहे.

मुरलीधर कृष्णा जावळे (रा.कोडोली) यांनी तक्रार दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रतिक्षा भोसले यांच्या आई सातारा नगरपालिकेच्या आरोग्य विभागात कार्यरत होत्या. मात्र नोकरीवर असतानाच त्यांच्या आईचा मृत्यू झाल्याने अनुकंपा तत्वावर प्रतिक्षा भोसले यांनी पालिकेत नोकरीचा दावा केला. यानुसार प्रतिक्षा यांचा दावा मंजूर करण्यात आला.

मात्र पालिकेतील ही नोकरी करण्यास प्रतिक्षा भोसले यांची तयारी नव्हती. याचदरम्यान प्रतिक्षा यांना कोडोली येथे राहणारे मुरलीधर जावळे हे भेटले. या भेटीत जावळे यांनी तुमच्या जागेवर माझ्या पत्नीला नोकरी लावा, असे प्रतिक्षा यांना सांगितले. यावेळी संशयित प्रतिक्षा यांनी ही नोकरी सोडण्यासाठी साडेचार लाख रुपयांची मागणी केली. संबंधित रक्कम दिल्यानंतर प्रतिज्ञापत्र तयार करुन त्या नोकरीचा वारस तुमची पत्नी असेल असे लिहून देण्यास तयार असल्याचा व्यवहार ठरला.

नोकरीचा विकण्याचा असा व्यवहार ठरल्यानंतर तक्रारदार मुरलीधर जावळे यांनी संशयित प्रतिक्षा भोसले यांना 1 ते 12 जून 2017 या कालावधीत वेळोवेळी 85 हजार रुपये दिले. यानंतरच्या काळात जावळे यांनी प्रतिक्षा भोसले यांच्याशी वारंवार संपर्क साधला, मात्र ठरल्याप्रमाणे कोणतीही कार्यवाही झाली नाही. कोणताही संपर्क होत नसल्याने व टाळाटाळ झाल्याने आपली फसवणूक झाल्‍याचे समजताचं  तक्रारदार यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात  धाव घेवून तक्रार दिली.