Tue, Apr 23, 2019 22:29होमपेज › Satara › जिजाऊ माँसाहेबांचे विचारच देशाला तारतील

जिजाऊ माँसाहेबांचे विचारच देशाला तारतील

Published On: Jan 14 2018 1:55AM | Last Updated: Jan 13 2018 10:41PM

बुकमार्क करा
सातारा : प्रतिनिधी

तीन वर्षांपूर्वी सिंदखेडराजाच्या विकास आराखड्याची घोषणा झाली; पण त्याची अद्याप पूर्तता झाली नाही. काही लोक निवडून आल्यानंतर मोठ्या पदावर जातात. त्यांना वाटते आपल्यामुळे समाज आहे; पण तसं नाही. या संपूर्ण समाजामुळे तुम्ही-आम्ही आहोत. ही शिकवण शिवछत्रपतींची असून. ती विसरता कामा नये. छत्रपती शिवराय आणि राष्ट्रमाता माँ जिजाऊ यांचे विचारच देशाला तारू शकतात, असे प्रतिपादन खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केले. 

सिंदखेडराजा, जिल्हा बुलडाणा येथे राष्ट्रमाता जिजाऊंच्या जयंती सोहळ्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे छत्रपती, तंजावरचे छत्रपती बाबाजीराजे भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. 

तीन वर्षांपूर्वी जिजाऊ सृष्टी आराखड्याची घोषणा झाली. मात्र, त्या घोषणेची पूर्तता करणे गरजेचे आहे. केवळ घोषणा करून निवडणुका लढवल्या जातात. लोकप्रतिनिधींनीही त्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असेही खा. उदयनराजे म्हणाले.

गेली 27 वर्षे मराठा सेवा संघ असेल किंवा अन्य संघटना असतील त्या सर्वांचे योगदान या कार्यक्रमासाठी मोठे आहे. या भागातील युवक, तसेच शेतकरी यांच्या प्रगतीबरोबरच या परिसराचाही विकास झाला पाहिजे,  असेही  खा. उदयनराजे म्हणाले. 

माँसाहेब जिजाऊ व छत्रपती शिवरायांनी सर्व समाजाला सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शिवरायांचे विचार आपण जोपर्यंत आचरणात आणत नाही तोपर्यंत देशाची प्रगती शक्य नाही. आजच्या नवीन पिढीनेही त्यांचा आदर्श घेऊन वाटचाल करावी, असे आवाहन खा. उदयनराजे यांनी केले. 

कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती म्हणाले, दिल्ली ते जिंजी असा दबदबा असलेल्या छत्रपती शिवरायांची जयंती 19 फेब्रुवारी 2018 रोजी थेट दिल्लीमध्येच साजरी होणार आहे. यासाठी राज्यातील खासदारांनी त्यामध्ये लक्ष  घालावे. सकल मराठा समाजाच्यावतीने आयोजित केलेल्या मोर्चाची दखल केवळ महाराष्ट्रात नाही तर  संपूर्ण जगाने घेतली असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले. 
जिजाऊ सृष्टीवर अद्यावत ग्रंथालय तयार केले जावे त्यासाठी आपण 50 लाख रुपये देवू, अशी घोषणाही युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी केली. यावेळी पुरुषोत्तम खेडेकर, विजय घोगरे, यांच्यासह विविध मराठा संघटनांचे प्रतिनिधी, सदस्य, पदाधिकारी, सिंदखेड राजा परिसरातील नागरिक उपस्थित होते.  प्रारंभी राष्ट्रमाता जिजाऊंना अभिवादन करण्यात आले.