होमपेज › Satara › पोक्सो प्रकरणातील संशयित जामिनासाठी उच्च न्यायालयात

पोक्सो प्रकरणातील संशयित जामिनासाठी उच्च न्यायालयात

Published On: Dec 06 2017 1:41AM | Last Updated: Dec 05 2017 10:47PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

पोक्सो प्रकरणातील संशयित आनंद पवार याचा सातारा जिल्हा न्यायालयात जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याने मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला. मंगळवारी त्याची सुनावणी होती. मात्र, अधिक माहिती समजू शकली नाही. दरम्यान, पोक्सो प्रकरणात पुणे विभागीय कार्यालयातील उपायुक्त अजित पवार यांचाही  या प्रकरणात सहआरोपी म्हणून उल्लेख असूनही सातारा पोलिसांकडून त्यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.

सातार्‍यातील अल्पवयीन मुलीला पळवून नेवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात आनंद पवार (रा. आरफळ ता. सातारा) याच्याविरुद्ध ऑगस्ट महिन्यात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. कसून चौकशीला सुरुवात केल्यानंतर तपासामध्ये उपायुक्त अजित पवार व सातार्‍यातील बिल्डर संदीप चव्हाण यांनी संशयित आनंद पवार याला मदत केल्याचे समोर आले. यातील संशयित व उपायुक्त हे दोघे चुलत भाऊ आहेत. दरम्यान, संशयित आनंद पवार याची पोलिस कोठडी संपल्यानंतर सध्या त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत येथील सातारा कारागृहात आहे. न्यायालयीन कोठडीत असताना संशयित आनंद पवार याने  गेल्या महिन्यात जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद झाल्यानंतर जिल्हा न्यायालयात संशयिताचा जामीन अर्ज फेटाळला. जिल्हा न्यायालयातील अर्ज फेटाळल्यानंतर आनंद पवार याने मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला. मंगळवारी त्याबाबत सुनावणी होती. तपासी अधिकारी पो.नि. नारायण सारंगकर यांच्याशी त्याबाबत संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही.