होमपेज › Satara › स्वातंत्र्यलढ्यात सातार्‍याने देशाला प्रेरणा दिली

स्वातंत्र्यलढ्यात सातार्‍याने देशाला प्रेरणा दिली

Published On: Aug 18 2018 1:02AM | Last Updated: Aug 17 2018 10:08PMसातारा : प्रतिनिधी

देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणार्‍या हुतात्म्यांचे स्मरण केले पाहिजे. त्यांनी केलेल्या त्यागातून प्रेरणा घेवून समाज उभारणीसाठी नवी पिढी उभी रहावी यासाठी हुतात्मा स्मारके प्रेरणास्थळे बनली पाहिजेत. सातार्‍याने स्वातंत्र्यलढ्यात देशाला प्रेरणा दिली, असे गौरवोद्गार जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय शिवतारे यांनी काढले.

सातार्‍यात ऑगस्ट क्रांती स्तंभ उभा आहे. या क्रांती स्तंभाचे नुकतेच नुतनीकरण करण्यात आल्यावर सातारा नगरपरिषदेच्या वतीने आयोजित हुतात्मा स्मारक लोकार्पण सोहळा पार पडला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात 9 ऑगस्टच्या क्रांती दिनाला खूप महत्व आहे. भारतात उत्तर प्रदेशातील बालिया, पश्‍चिम बंगालमधील मिदनापूर आणि महाराष्ट्रातील सातारा या चळवळींच्या केंद्रांनी महत्वाची भूमिका बजावली होती. क्रांतीसिंह नाना पाटील यांनी प्रती सरकार निर्माण करुन ब्रिटिशांना हैराण करुन सोडले. ब्रिटीशांविरोधात जनसामान्यात मोठा असंतोष निर्माण झाला होता.  अनेकांनी प्राणाची बाजी लावून इंग्रजांविरोधातील हा लढा लढला, असे त्यांनी सांगितले. 

यावेळी आ. शंभुराज देसाई, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, मुख्याधिकारी शंकर गोरे, स्वातंत्र्य सैनिक सोपानराव घोरपडे, मानसिंगराव शिंदे, पतंगराव फाळके, नरेंद्र पाटील, नगरसेवक उपस्थित होते. 

सैनिकांचा जिल्हा म्हणून सातार्‍याची ओळख असून हे बिरुद खूप अभिमानास्पद आहे. या जिल्ह्यातील शेकडो सैनिक देशाच्या स्वातंत्र्यासाठी घरावर तुळशीपत्र ठेवून लढले. समाजाची ही प्रेरणास्थाने आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व हुतात्मा स्मारकांना निधी देवून त्याचे नुतनीकरण करण्यात आले. जिल्ह्यातील 14 हुतात्मा स्मारकांमध्ये वाचनालय, संरक्षक भिंती, गार्डन करण्यात आली. या स्मारकांमध्ये हुतात्म्यांची चरित्रे, त्यांच्या शौर्यगाथा असलेले साहित्य ठेवले जाणार आहे. यातून युवकांना नवी प्रेरणा मिळण्यास उपयोग होईल. सातार्‍याची भूमी छत्रपती शिवाजी महाराजांची, प्रती सरकार स्थापन करणार्‍या नाना पाटलांची तसेच महाराष्ट्राचा मंगल कलश आणणार्‍या यशवंतराव चव्हाणांची आहे.  त्यामुळे फक्त राज्यालाच नव्हे तर देशाला प्रेरणा देण्याचे काम सातार्‍याने केले आहे, असे ना. शिवतारे म्हणाले.

क्रांती स्तंभाला ना. विजय शिवतारे, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे आणि पोलीस अधीक्षक पंकज देशमुख तसेच मान्यवरांनी पुष्प वाहून अभिवादन केले. स्वातंत्र्यदिनी जिल्ह्यात 14 हुतात्मा स्मारकांचे लोकार्पण करण्यात आले.यावेळी  तुकाराम किरदर, महेश शेट्टे, गंगाधर फडतरे आदि उपस्थित होते.