Tue, May 26, 2020 17:27होमपेज › Satara › शरद पवार उभे राहिले तर माझी माघार : उदयनराजे भोसले (video)

शरद पवार उभे राहिले तर माझी माघार : उदयनराजे भोसले (video)

Published On: Sep 24 2019 4:05PM | Last Updated: Sep 24 2019 4:08PM
सातारा : प्रतिनिधी

राष्ट्रवादीचे माजी खासदार व नुकतेच भाजपवासी झालेले उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी पुन्हा सातारच्या राजकारणात ट्विस्ट निर्माण केला. सातारा लोकसभा पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर अवघ्या काही तासात, जर खा. शरद पवार साताऱ्यातून निवडणुकीसाठी उभे राहिले तर आपण निवडणुकीला उभे राहणार नसल्याचे वक्तव्य खुद्द उदयनराजे भोसले यांनी केले. पवार साहेब आपल्या वडीलासमान असल्याचे म्हणत ते कमालीचे भाऊक झाले.

उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत थेट खासदारकीचा राजीनामा दिला. साताऱ्यातील राजकारण यामुळे ढवळून निघाले असतानाच त्यांनी दिल्लीमध्ये अमित शहा यांच्या उपस्थित प्रवेश केला. तसेच नाशिक येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला हजेरी लावली. शनिवारी विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर लोकसभा पोट निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल असे वाटत असताना तसे झाले नाही. मात्र मंगळवारी सातारा लोकसभा निवडणूक कार्यक्रमही जाहीर झाला. पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर लोक उदयनराजे भोसले यांना जलमंदिर येथे भेटण्यासाठी गेले होते.

जलमंदिर येथे गर्दी झाल्याने प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधी तेथे गेले होते. यावेळी साताऱ्यातून खा. शरद पवार स्वतः निवडणुकीसाठी उभे राहिल्यास तुमची भूमिका काय असेल असे उदयनराजे भोसले यांना विचारण्यात आले. यावर उदयनराजे भोसले म्हणाले, खा. शरद पवार यांच्यावर काल, आज व उद्या ही प्रेम राहणार आहे. ते आपल्याला वडीलासमान आहेत. ते स्वतः निवडणुकीसाठी उभे राहिले तर आपण उभे राहणार नाही, असे म्हणत ते भाऊक झाले.