Thu, Jun 27, 2019 16:03होमपेज › Satara › जिल्ह्यात या महिन्यात केव्हाही होणार ग्रामसभा

जिल्ह्यात या महिन्यात केव्हाही होणार ग्रामसभा

Published On: Aug 04 2018 10:28PM | Last Updated: Aug 04 2018 10:09PM
सातारा : प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील 1 हजार 496 ग्रामपंचायतींमध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये ग्रामसभा घेण्याबाबतचा फतवा जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने काढला आहे. या ग्रामसभा दि. 15 ऑगस्टलाच घेण्याबाबत कोणतेही बंधन नसून या महिन्यात कधीही ग्रामसभा घ्याव्यात असे शासनाचे निर्देश आहेत. दरम्यान, कोणकोणते विषय सभेपुढे घेण्यात यावेत या विषयांची यादीही  ग्रामपंचायतींना गटविकास अधिकार्‍यांमार्फत दिल्या आहेत.
ग्रामपंचायत अधिनियमानुसार वर्षभरात चार ग्रामसभांचे आयोजन करण्याचे शासनाचे निर्देश आहेत.  त्यानुसार एप्रिल, मे, ऑगस्ट, नोव्हेंबर या महिन्यात व 26 जानेवारी रोजी या सभा घेण्याची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे. जिल्ह्यातील  ग्रामपंचायतींमध्ये ऑगस्टमध्ये आयोजित  केल्या जाणार्‍या ग्रामसभेमध्ये 28 विषय घेण्याचे  आदेश जिल्हा परिषदेचे  प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन थाडे यांनी दिले आहेत.
शासनाच्या निर्देशानुसार या महिन्यातील या ग्रामसभांमध्ये गावातील मुलामुलींचा समतोल  राखण्याच्यादृष्टीने गावातील एकही गरोदर माता गर्भलिंग निदानासाठी जाणार नसल्याबाबत ठराव करणे. ग्रामपंचायतीच्या विकासाच्या दृष्टीने ग्रामपंचायत विकास आराखडा याबाबत आढावा, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण  व राज्य पुरस्कृत आवास योजनाअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलांची ग्रामसभेत अद्यायावत माहिती सादर करावी. प्लॅस्टिक व थर्माकोल मुक्त महाराष्ट्र अधिसूचनेची अंमलबजावणी, ग्रामपंचायतीअंतर्गत महात्मा गांधी  राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाची कामे, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांची अंमलबजावणी, ग्रामीण भागातील घरांची नोंदणी पती पत्नी यांच्या नावे करणे, बाल हक्क संरक्षण समिती कार्यान्वीत करणे, ग्राम बालविकास केंद्रातील बालकांसाठी औषधे उपलब्ध करून देण्यासाठी निधी देणे आदी विषयांवर या ग्रामसभेत उहापोह 
 होणार आहे.