Mon, Apr 22, 2019 15:40होमपेज › Satara › गोंधळेकरला उचलला अन् सुरू झाली धरपकड

गोंधळेकरला उचलला अन् सुरू झाली धरपकड

Published On: Aug 20 2018 12:04AM | Last Updated: Aug 19 2018 11:31PMसातारा : विठ्ठल हेंद्रे 

पुणे येथे अंनिस कार्याध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोलकर यांची दि. 20 ऑगस्ट 2013 रोजी झालेली हत्या व दि. 10 ऑगस्ट 2018 रोजी सातार्‍याच्याच सुधन्वा गोंधळेकर या हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्याला झालेली अटक या दोन घटना सातारकरांसाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरल्या आहेत. हत्या ते हत्यारे हा ‘पिक्चर’ स्पष्ट होण्यासाठी तब्बल 5 वर्षांचा कालावधी गेला. सातार्‍यातल्या गोंधळेकरला, पुण्यातल्या राऊतला, औरंगाबादेतल्या कळसकरला पोलिसांनी उचलले अन् सुरू झालेल्या धरपकडीने दाभोलकर हत्याप्रकरणाचा पर्दाफाश झाला. 

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पाच वर्षापूर्वी भल्या सकाळी झालेली हत्या हादरवून टाकणारी होती. हत्येनंतर पुणे, सातारासह संपूर्ण महाराष्ट्रात अंधश्रध्दा निर्मृलन समितीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. ‘दाभोलकरांचे मारेकरी पकडा,’ असा जनमाणसातून उठाव झाला. मात्र पहिली दोन वर्षे पुणे पोलिस व सीबीआयच्या हाती विशेष काहीच लागले नाही. अडीच वर्षानंतर विरेंद्र तावडेला अटक झाली तर  सारंग अकोलकर व विनय पवार हे फरार झाले. मात्र, यामधूनही ठोस असे काहीच समोर न आल्याने डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास रेंगाळतच राहिला. सरकारने मारेकर्‍यांना पकडून देण्यासाठी 5 लाखाचे बक्षीसही जाहीर केले होते. मात्र, तरीही धागेदोरे मिळत नव्हते. सातारचे डॉ.नरेंद्र दाभोलकर, कोल्हापूरचे कॉ.गोंविद पानसरे,  एम.एम.कलबुर्गी व  गौरी लंकेश असे विचारवंतांच्या हत्याकांडाचे सत्र सुरुच राहिले. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाल्यानंतर ही हत्या हिंदुत्वादी संघटनेकडून झाली असल्याचे पहिल्या दिवसांपासून अंनिस कार्यकर्ते सांगत होते. मात्र मुळातच विचारवंत, लेखक, तज्ञ यांच्या हत्येचा नेमका तपास कसा करायचा? कोणाकडे कशी चौकशी करायची? अशा हत्यासंबंधी पोलिसांनी कोणती रणनिती आखली पाहिजे? हे पोलिस यंत्रणेला समजत नव्हते.

अखेर 2018 मधील ऑगस्ट महिन्यातील 10 तारीख उजाडली अन् तपास यंत्रणेच्या हाती निश्‍चित धागेदोरे लागले. या दिवशी सातारच्या  सुधन्वा गोंधळेकरसह तिघांना नालासोपार्‍यात  मुंबई एटीएसने शस्त्रसाठ्यासह अटक केली. नालासोपारा येथे वैभव राऊत याच्या घरातून गावठी बॉम्बसह बॉम्ब बनवणारी स्फोटके सापडली. याच प्रकरणात सातारच्या सुधन्वाला अटक केल्यानंतर त्याच्याकडेही पिस्टल, बंदूक व घातक शस्त्रे सापडली. डॉ.नरेंद्र दाभोलकर व सुधन्वा गोंधळेकर या दोघांमधील समान धागा म्हणजे दोघेही सातारचे. एकूण सापडलेली शस्त्रास्त्रे  व सातारा हा समान धागा. त्यातच गोंधळेकर एकेकाळचा सनातनी हिंदुत्ववादी. गोंधळेकरला नालासोपाराप्रकरणी पकडल्यानंतर दाभोलकर हत्येसंदर्भातील व्यक्तींशी गोंधळेकरचा संपर्क असणारच याचा सुगावा लागला गेला. लगोलग डॉ. नरेंद्र  दाभोलकर हत्येचा तपास या घटनेच्या अनुषंगाने करण्याची मागणी  अंनिसचे डॉ.हमीद दाभोलकर यांनी दै.‘पुढारी’कडे केली.

डॉ.हमीद दाभोलकर यांनी दै.‘पुढारी’कडे केलेल्या या स्फोटक मागणीमुळे सातारासह महाराष्ट्रात पुन्हा खळबळ उडाली. या वृत्ताची मुंबई, पुणे एटीएसने गंभीर दखल घेतली. वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर व शरद कळस्कर या तिघांकडे कसून चौकशी सुरु असतानाच सचिन अंदुरेचे नाव समोर आले आणि एटीएसकडे डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणाची कबुलीच दिली. एकूणच या सार्‍या प्रकरणात सातार्‍याच्या सुधन्वा गोंधळेकरचा संशयितांशी असलेला संपर्क महत्वपूर्ण ठरला. 


सुधन्वाकडे बंदुकांचा कारखानाच...

नालासोपारा कनेक्शन प्रकरणात सुधन्वा गोंधळेकर याला अटक केल्यानंतर त्याच्याकडे बंदुकांचे आगारच सापडले आहे. सुधन्वा हा स्वत: बंदुका तयार करत होता. त्याच्याकडे गावठी पिस्टल मॅगझीनसह 10, गावठी कट्टा 1, एअरगण 1, पिस्टल बॅरल 10, अर्धवट तयार पिस्टल बॉडी 6, पिस्टल मॅगझीन 6, अर्धवट तयार मॅगझीन 3, अर्धवट तयार पिस्टल स्लाईड 7, रिले स्विच 16, वाहनांच्या नंबर प्लेट 6, ट्रिगर मेकॅनिझम 1, चॉपर, स्टील चाकू 1 अशी शस्त्रे सापडली आहेत. ‘एरव्ही अशी घातक शस्त्रे खरेदी केल्यानंतर ज्याच्याकडून खरेदी केली जातात तो सापडल्यानंतर घेणाराचेही बिंग फुटते,’ यामुळे हा प्रकार टाळण्यासाठी सुधन्वा टोळीसह थेट बंदुकांची नव्याने बांधणीच करत असल्याचे अधोरेखित झाले आहे. दरम्यान, सुधन्वा सातार्‍यात हिंदुत्ववादी संघटनांमध्ये सक्रीयपणे कामही करत होता व त्यासंबंधीत सातारा पोलिसांना ‘डाटा’ही तयार केला आहेे. डॉ.नरेंद्र दाभोलकर ते गौरी लंकेश या सर्वांची हत्या बंदुकीच्या गोळीतून झालेली आहे. याबाबतचा बॅलेस्टीक अहवालही तसा सांगत असल्याचे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे.