Wed, Jun 26, 2019 23:33होमपेज › Satara › गर्भलिंग निदानची मशिन जप्त

गर्भलिंग निदानची मशिन जप्त

Published On: Jun 20 2018 1:16AM | Last Updated: Jun 19 2018 11:40PMसातारा : प्रतिनिधी

गर्भलिंग निदान चाचणी करणार्‍या नाथा सहदेव खाडे (वय 31, रा. धामणी, पो. पिंपरी, ता. माण) या युवकाला स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाने मशिनसह ताब्यात घेऊन अटक केली. औंध, ता. खटाव येथे झालेल्या या कारवाईने पुन्हा एकदा वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून या रॅकेटमध्ये कोणा-कोणाचा समावेश आहे? डॉक्टर, एजंट साखळीचा पर्दाफाश होणार का? असे सवाल उपस्थित झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, एलसीबीच्या पथकाला औंध परिसरात एक युवक संशयितरीत्या फिरत असल्याची माहिती मिळाली. दि. 19 रोजी पोलिसांचे एक पथक तयार करून सापळा रचला असता नाथा खाडे हा संशयित दुचाकीवर निदर्शनास आला. पोलिसांनी त्याला औंध येथील कळंबी गावच्या हद्दीतून ताब्यात घेतले. तपासणी केली असता त्याच्या सॅकमध्ये सोनास्टार कंपनीची सोनोग्राफी मशीन आढळून आली. मशीनबाबत पोलिसांनी विचारले असता त्याने मशीनद्वारे गर्भलिंग निदान करत असल्याचे सांगितले.

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी अधिक चौकशीला सुरुवात केली. संशयित नाथा खाडे याला तू डॉक्टर आहे का? असे विचारले असता त्याने डॉक्टर नसल्याचे सांगितले. गर्भलिंग निदान परवानाबाबत विचारले असता तो परवाना नसल्याचेही सांगितले. संशयित खाडे याचे केवळ नववी शिक्षण झाले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी मशीन, दुचाकी, मोबाईल जप्त करुन संशयिताला ताब्यात घेतले. जप्त केलेला सर्व मुद्देमाल 2 लाख 26 हजार 400 रुपयांचा असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि पद्माकर घनवट, फौजदार सागर गवसणे, पोलिस हवालदार पृथ्वीराज घोरपडे, विलास नागे, संजय पवार, जोतीराम बर्गे, मोहन नाचण, योगेश पोळ, रवि वाघमारे, राजकुमार ननावरे, रवि वाघमारे, संतोष जाधव, मोना निकम, प्रवीण कडव, गणेश कचरे, मारुती अडागळे यांनी कारवाईमध्ये सहभाग घेतला.

दरम्यान, या कारवाईने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. संबंधित मशीन नेमके कोणाचे? ते मशीन कधीपासून वापरले जात आहे? आतापर्यंत किती सोनोग्राफी केल्या आहेत? या साखळीमध्ये नेमका कोणाकोणाचा समावेश आहे? सिव्हील व जिल्हा परिषदेचा अरोग्य विभाग आतापर्यंत गाफील कसा राहिला? असे प्रश्‍न उपस्थित झाले आहेत.