Sat, Apr 20, 2019 08:42होमपेज › Satara › पर्यावरणपूरक गणेशोत्सव उरला कागदावरच

पर्यावरणपूरक गणेशोत्सव उरला कागदावरच

Published On: Aug 20 2018 12:04AM | Last Updated: Aug 19 2018 11:01PMसातारा : प्रतिनिधी

गणेशोत्सवाला पर्यावरणपूरकतेची जोड देण्याचा प्रयत्न निसर्गप्रेमींकडून सुरू आहे. मात्र गणेशभक्तांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने पर्यावरणपूरक गणेशोत्सव ‘कागदा’वरच राहू लागल्याचे चित्र गेल्या काही वर्षांपासून दिसत आहे. दोन वर्षांपूर्वी तब्बल दोन हजार कागदी लगद्याच्या मूर्ती तयार करण्यात आल्या होत्या. त्यापैकी हजारहून अधिक मूर्ती शिल्लक राहिल्या, त्या गतवर्षी देण्यात आल्या. परंतू त्याला मिळणारा प्रतिसाद पाहता यंदा या मूर्तींची मागणीच घटली आहे. काही मोजक्याच मूर्ती बनवल्या जाणार आहेत. दुसर्‍या बाजूला शाडूच्या मुर्तींचे उत्पादनही कमी असल्याचे चित्र आहे. एकूण पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी व्यापक मोहीम हाती घेण्याची गरज निर्माण झाली आहे. 

अवघ्या 22 दिवसांवर गणरायाचे आगमन येऊन ठेपले आहे. घरोघरी गणेशाची आतुरतेने गणेशभक्त वाट पाहत आहेत. सार्वजनिक गणेश मंडळांचे जंगी नियोजन सुरू झाले आहे. दरवर्षी हजारो टन प्लास्टर, रासायनिक रंग, निर्माल्य पाण्यात मिसळून प्रदूषणात भर पडते आहे. यासाठी निसर्गप्रेमींनी ‘इको फ्रेंडली’ गणेशोत्सवाचा जागर केला. परंतु त्याला पाहिजे तितका प्रतिसाद मिळेना झालाय. मूळात प्लास्टरच्या मूर्तीपेक्षा अधिक दणकट आणि पर्यावरणपूरक असणार्‍या कागदी लगद्याच्या गणेशमूर्तींच्या निर्मितीचा उपक्रम चार वर्षांपूर्वी जिल्ह्यात सुरू झाला. दरवर्षी दोन-तीन हजार मूर्ती बनवल्या जात होत्या. या मूर्ती दिसायला आकर्षक नसल्याने त्यांची विक्री घटली आहे. तसेच प्लास्टरच्या मूर्तीपेक्षा अधिक वेळही लागत असल्याने त्यासाठी मूर्तिकारांचा पुढाकारही नसतो, अशी माहिती काही मूर्तीकारांनी दिली.