Wed, Mar 20, 2019 23:12होमपेज › Satara › ई कचर्‍याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावा 

ई कचर्‍याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावा 

Published On: May 26 2018 10:32PM | Last Updated: May 26 2018 10:11PMसातारा : प्रतिनिधी

ई कचर्‍याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावली नाही तर अत्यंत गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.  भारतामध्ये दरवर्षी लाखो टन ई कचर्‍याची निर्मिती होते. परंतु, त्यातील अधिकृतरित्या रिसायकल होणार्‍या कचर्‍याचे प्रमाण केवळ दोन टक्के इतकेच आहे. ई कचर्‍यासाठी अधिकृत संकलन केंद्र सुरू करून हिरवाईने घेतलेली ही जबाबदारी  म्हणजे ई कचरा प्रदूषणाला अटकाव घालणारे महत्त्वाचे पाऊल आहे, असे मत पासपोर्ट आणि व्हिसाचे कॉन्सुलर ज्ञानेश्‍वर मुळे यांनी व्यक्त केले .

‘हिरवाई’  संस्थेच्या  माध्यमातून  हिरवाई प्रकल्पामध्ये  ई कचरा संकलन केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ‘हिरवाई’च्या संस्थापिका प्रा. संध्या चौगुले उपस्थित होत्या. 
ज्ञानेश्‍वर मुळे म्हणाले, महाराष्ट्र हे  सर्वाधिक ई - कचरा निर्माण करणारे राज्य आहे. मात्र, या कचर्‍याची वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावली जात नाही. आपल्याकडे  मोठ्या  प्रमाणात ई-कचर्‍याची  निर्मिती होते त्या मानाने ई- कचरा संकलन केंद्रे खूप कमी आहेत.  त्यामुळे तो एक तर रस्त्यावर फेकला जातो किंवा कायद्याची पायमल्ली करून  भंगारमध्ये दिला जातो. यामध्ये काम करणार्‍या बालमजुरांच्या आरोग्याचा प्रश्‍नही गंभीर बनला असून ई- कचरा कायद्यांतर्गत या कचर्‍याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावणे गरजेचे आहे.  

 गेले संपूर्ण वर्षभर प्रा. संध्या चौगुले यांनी जिल्हा परिषद शिक्षण  विभाग,  नगरपालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ  यांच्या सहकार्याने सातार्‍यातील अनेक शाळा, महाविद्यालये, कार्यालये, हॉस्पिटल्स, यांच्यामध्ये ई कचर्‍यामुळे होणार्‍या गंभीर  समस्यांबद्दल मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. 35 शाळांतील शिक्षक आणि हजारो विद्यार्थी यामध्ये सक्रिय सहभागी झाले. यामधून हजारो टन ई-कचरा जमा होत आहे. त्या कचर्‍याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावता यावी यासाठी हिरवाई   ई- कचरा व्यवस्थापनामध्ये देशपातळीवर काम करणार्‍या ‘करो संभव’ या टीम  बरोबर काम करत आहे . 

प्रा. संध्या चौगुले म्हणाल्या, दुरुस्त होऊ न शकणार्‍या इलेक्ट्रॉनिक किंवा इलेक्ट्रिकल वस्तू उदाहरणार्थ डेस्कटॉप, हेडफोन्स, इअरफोन्स, चार्जर, लॅपटॉप, बॅटरी, टॅबलेट्स, मोबाइल, प्रिंटर, टोनर, अ‍ॅडॉप्टर, मिनी कॉम्प्युटर्स, सीपीयु, की बोर्ड, माऊस, मॉनिटर्स, की पॅड, केबल्स, मदरबोर्ड अशा खराब झालेल्या वस्तू आपण महिन्याच्या पहिल्या रविवारी हिरवाई येथील ई- कचरा संकलन केंद्रांमध्ये जमा करून पर्यावरण प्रदूषणाला आळा घालण्याची सामाजिक जबाबदारी घेऊ शकता, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमास कॅप्टन शिवाजी यादव, कल्याण तावरे, किरण केंद्रे, सुवर्णरेहा जाधव, लक्ष्मणराव यादव आदी उपस्थित होते.