Mon, Jun 17, 2019 02:42होमपेज › Satara › दाभोलकरांनी काय घोडं मारलं होतं अंदुरे आणि कळसकराचं?

दाभोलकरांनी काय घोडं मारलं होतं अंदुरे आणि कळसकराचं?

Published On: Aug 20 2018 12:04AM | Last Updated: Aug 19 2018 11:35PMसातारा : प्रतिनिधी

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या औरंगाबादच्या सचिन अंदुरे व शरद कळसकर यांचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी नेमके काय घोडे मारले होते? दाभोलकरांना मारण्याइतपत या दोघांची मजल का गेली? असा सवाल आता निर्माण झाला आहे. 

कोण आहे सचिन अंदुरे?

आरोपी सचिन अणदुरे हा औरंगाबादेत सध्या पत्नी आणि आपल्या एक वर्षीय मुलीसह कुंवारफल्ली भागात भाड्याच्या खोलीत रहात होता. मागील 9 महिन्यांपूर्वी तो या खोलीत भाड्याने राहण्यासाठी आलेला होता. तो औरंगाबादचा रहिवाशी आहे. गुजराती हायस्कूलमध्ये त्याने आपले शालेय शिक्षण आणि स. भु. महाविद्यालयात महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले आहे. तो निराला बाजार भागातील एका कापड दुकानावर सेल्समन म्हणून आठ हजार रुपये वेतनावर गेल्या काही दिवसांपासून नोकरी करत होता. त्याचे आई-वडील हयात नाहीत. त्याला एक मोठा भाऊ आहे. तो कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणीचा आहे. तो आपल्या फेसबुक पेजवर सतत अत्यंत भडक अशा पोस्ट करत असे.

मारेकरी अंदुरेपर्यंत कशी पोहचली लिंक..?

शस्त्रसाठाप्रकरणी अटकेत असलेला शरद कळसकर औरंगाबाद जिल्ह्यातील असल्याचे समोर आले होते. त्यानेच सचिन अंदुरेचे नाव घेतले. त्यामुळेच कळसकरनंतर राजाबाजार भागातून एटीएसने सचिनला पकडले होते. शस्त्रसाठा प्रकरणातील आरोपी वैभव राऊत याच्या जवळून संपर्कात असलेला दौलताबाद येथील शरद कळसकर याचा सचिन अंदुरे हा मित्र असल्याची माहिती समोर येत आहे. शरदला एटीएसने ताब्यात घेताच सचिनचे नाव समोर आले. त्यामुळे अंदुरेवर पोलिसांनी वॉच ठेवला होता. त्याच्या फेसबुकवरही पोलिसांचे लक्ष होते. त्याने दाभोलकरांचा खून केल्याचे निश्‍चित झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. दि. 14 रोजी अटक केल्यानंतर 4 दिवसांनी याची माहिती प्रसारमाध्यमांना देण्यात आली होती. त्यामुळे याबाबत किती गोपनीयता बाळगण्यात आली हे लक्षात येते.

कळसकरमुळे अंदुरेचा सहभाग उघड

सनातन संस्थेशी संबंधित असलेले काही कार्यकर्ते महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये भीषण घातपात घडवण्याच्या तयारीत असून, त्यांनी त्यासाठी स्फोटकांची जमवाजमव केल्याची माहिती मुंबई एटीएसला मिळाली होती. त्यानुसार एटीएसने नालासोपारा येथे दि. 9 ऑगस्टला छापा टाकून सनातनच्या वैभव राऊतसह सातार्‍याच्या सुधन्वा गोंधळकर व आणखी एकाला अटक केली. त्यांच्याकडून 20 गावठी बॉम्बसह बॉम्ब बनवण्यासाठी लागणारा स्फोटकांचा मोठा साठा एटीएसच्या हाती लागला होता. यामधील अन्य एक आरोपी शरद कळसकर हा औरंगाबादच्या दौलताबाद किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या केसापुरीचा रहिवाशी होता. तोही या कटात सहभागी होता.  

अंदुरेच्या घरमालकाला बसला धक्का

सचिन आणि त्याची पत्नी दोघेही औरंगाबादेत कामानिमित्ताने आले होते. सचिन हा कापड दुकानात कामाला होता. त्यामुळे बँक कर्मचारी असलेले घरमालक राधाकिशन बाबुराव शिंदे यांचा त्याच्याशी संबध येत होता. त्याचा स्वभाव पाहून शिंदे यांनी सचिनला घर भाड्याने दिले होते. गेल्या 9 महिन्यांपासून तो इथं राहत होता. 14 तारखेला पाच ते सहा लोक त्याच्याकडे आले होते. ते सचिनला भेटण्यासाठी आले असल्याचं सांगितलं आणि काही तासांत ते निघून गेले. त्यानंतर काही दिवसांनंतर वृत्तपत्रात अंदुरेच्या अटकेची बातमी वाचून शिंदे यांना धक्काच बसला.